Tuesday, September 16, 2025

सोमय्या पिता-पुत्राला हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

सोमय्या पिता-पुत्राला हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई हायकोर्टाने आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन बुधवारी मंजूर केला आहे. यामुळे सोमय्या पिता-पुत्राला दिलासा मिळाला आहे. सोमय्यांविरोधात अद्याप कोणताही पुरावा आढळून आलेला नाही, असे मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितले.

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी राऊत यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. याप्रकरणी अटकेची भीती असल्याने सोमय्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या माहितीनंतर कोर्टाने नील आणि किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी मुंबईत निधी गोळा केला होता. हा निधी राजभवनाकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. पण, सोमय्यांनी निधी राजभवनाला दिला नाही. यामुळे संजय राऊतांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना अटक होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पहिल्यांदा सत्र न्यायालयाने पिता-पुत्रांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर सोमय्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिला होता.

Comments
Add Comment