मुरूड (वार्ताहर) : गुजरातहून मासेमारी करण्यासाठी आलेली नौका वादळात तांत्रिक बिघाडामुळे मुरुड समुद्रात भरकटून आली. यावेळी सदर नौका येथील पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागे रात्रभर अडकून पडली होती. खवळलेल्या समुद्रात लाटांमुळे ही बोट मोरा बंदरात वाहून आली. सदर माहिती मिळताच मुरुड प्रशासनाने व बंदर खात्याने या बोटीतील खलाशांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. या बोटीतील सर्व १० खलाशांना वाचविण्यात मेरीटाईम बोर्ड यांना यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ निर्माण झाले आहे. या वादळामुळे गुजरातमधून मासेमारी करण्यासाठी आलेली नौका वादळात तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात भरकटली होती. ९ ऑगस्ट रोजी मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागे ही नौका रात्रभर अडकली होती. यावेळी बंदर खात्याने व स्थानिक प्रशासनाने वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतु खवळलेल्या समुद्रातील लाटांमुळे रात्री शक्य झाले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ही बोट वाहत मोरा समुद्रात आली. त्यावेळी हेलिकॉप्टर बोलावून या नौकेतील दहा खलाशांना वाचविण्यात आले. या दहा जणांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व खलाशी सुखरूप असून घाबरलेल्या अवस्थेत आहेत, अशी माहिती मुरुड बंदर अधिकारी समिर बारापत्रे व तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली आहे.
या बोटीतील वाचविण्यात आलेल्या खलाशांची नावे पुढीलप्रमाणे १) वीर बाबुलाल बायमाजी वय १३ रा. वलसाड, २) अजय चंदूभाई नायाब वय २५ रा. उदवाड, वलसाड, ३) शुभम सुभाषभाई माची वय १९ या. उमरगा, वलसाड, ४) निखिल उमेशभाई याची वय १७ उमरगा, वलसाड ५) बंटी चयनाभाई माची वय २८ या उमरगा, वलसाड ६) राजेश किशन हरबडी वय २४ पारधी, वलसाड ७) आशिष रमेश वारली वय २४ रा. उमरगा, वलसाड ८) निलेश काकडीया वय २२ रा. उमरगा, वलसाड ९) अश्विन बैला वय २४ रा. उमरगा वलसाड १०) मनीष राकेशभाई हडपती वय ३२ पारधी, वलसाड हे सर्व गुजरात राज्यातील आहेत.