रोहित गुरव
गेले ११ दिवस सुरू असलेला राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेचा थरार अखेर सोमवारी थांबला. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी पदकतालिकेत वर्चस्व राखत बर्मिंगहॅममध्ये तिरंगा डौलाने फडकवला. शेवटचे दोन दिवस गाजवत भारतीय खेळाडूंनी पदकांची अक्षरश: लयलूट केली. पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, अचंता शरथ कमल यांनी शेवटच्या दिवशी सुवर्णपदकांचा चौकार लगावत स्पर्धेचा शेवट गोड केला. राष्ट्रकुल २०२२ मध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह भारताने एकूण ६१ पदकांची कमाई करत बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत चौथे स्थान मिळवले. विशेष म्हणजे या पदक तालिकेत पहिल्या नऊ देशांमध्ये आशिया खंडातील भारत हा केवळ एकमेव देश आहे. त्यामुळे अर्थातच भारत गौरवास पात्र आहे. बर्मिंगहॅममध्ये मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताला पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पदकांचा तो धडाका लावला तो अखेर शेवटच्या दिवसापर्यंत. जेरेमी लालरिनुंगा, अचिंता शेउली, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगट, नवीन कुमार, भाविना पटेल यांनी सुवर्ण भरारी घेतली.
अचंता शरथ कमलने टेबल टेनिसमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालत पदकांच्या मालिकेला पूर्णविराम दिला. पदक विजेत्या खेळाडूंमध्ये वेटलिफ्टर, कुस्ती, टेबल टेनीस, बॉक्सिंग, बॅडमिंटन या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे क्रिकेट, कबड्डी, खो-खो या खेळांसह वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, टेबल टेनिस या खेळातही भारतीय खेळाडूंनी यशस्वी भरारी घेतली असल्याचे राष्ट्रकुलच्या निमित्ताने समोर आले असून ते कायम आहे. पदक तालिकेतील भारतीयांची कामगिरी गेल्या दोन राष्ट्रकुल स्पर्धांच्या तुलनेत फारशी वेगळी नाही. २०१० ला खेळली गेलेली राष्ट्रकुल स्पर्धा भारतासाठी सर्वात यशस्वी ठरली. या स्पर्धेत ३९ सुवर्ण, २६ रौप्य आणि ३६ कांस्य पदकांसह भारताने १०१ पदके जिंकली होती. त्यानंतर २०१४ साली भारताने १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह ६४ पदके आपल्या नावे केली होती. या तुलनेत बर्मिंगहॅममधील कामगिरी फारशी विशेष नसली तरी नक्कीच वेगळी आहे. कुस्तीसह वेटलिफ्टिंगमधली भारतीय खेळाडूंची कामगिरी अधिक चर्चीली गेली असली, तरी लॉन बॉल खेळातील महिला संघाची कामगिरी देशवासीयांसाठी लक्षवेधी ठरली. लॉन बॉल खेळ हा तसा दुर्लक्षितच. भारतातच काय युरोप वगळता अन्य खंडांमध्ये त्याचे फारसे चाहते नाहीत. लॉन बॉल हा एक मैदानी खेळ आहे. त्याचा एक प्रकार प्राचीन इजिप्तमध्ये खेळला जात होता आणि आता युरोपियन देशांमध्ये खेळला जातो. पिवळा बॉल हा ‘जॅक’ असतो, तर लाल आणि निळे बॉल विशिष्ट अंतरावरून लक्ष्य करतात. खेळाडूला विविध रंगांचा चेंडू २३ मीटर अंतरावरून लक्ष्यावर (जॅक) आणावा लागतो. ज्याचा चेंडू लक्ष्याच्या सर्वात जवळ जातो त्याला पॉइंट मिळतो. खेळाडू सामन्यात चेंडू फिरवतात. क्रिकेट, फुटबॉल या मोठ्या खेळांच्या शर्यतीत हा खेळ झाकोळलेला; परंतु भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकत या खेळाबाबत उत्सुकता वाढवली आहे. अशा दुर्लक्षित खेळाला भारतासारख्या खेळप्रिय देशाकडून प्रोत्साहन मिळणे त्या खेळासाठी स्वागतार्ह आहे. भारतीय महिला खेळाडूंनी या खेळातील क्रांतीकरिता यशाचे पाऊल उचलले आहे. त्याला भविष्यात यश मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण क्रिकेट, कबड्डी यांसारख्या खेळांच्या प्रसिद्धीची बाजारपेठ जवळपास भारतातच आहे. त्यामुळे आयपीएलसह प्रो-कबड्डी या देशी खेळाला जगाने डोक्यावर घेतले आहे. भारतात खेळाडूंचा यथोचित आदर राखला जातो. ही कसर दुर्लक्षित खेळांमध्येही भरून निघावी. त्यासाठी राज्य-राष्ट्रीय पातळीवर हालचाली व्हायला हव्यात. यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आग्रही आहेत. ठिकठिकाणी दौरे करून ते खेळांच्या प्रचारा-प्रसाराकरिता प्रयत्नशील आहेत. यापूर्वी क्रीडा क्षेत्रातील कीर्ती आझाद हे लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र त्यांनी क्रीडा क्षेत्राला निराशच केले. सुनील गावस्कर यांनाही राज्य सरकारने भूखंड दिला होता. त्याचे पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे. सध्या ऑलिम्पिक पदकविजेते राजवर्धन राठोड केंद्रीय क्रीडा राज्यमंत्रीपदी आहेत, तर फिरकीपटू हरभजन सिंग यांनाही तृणमूल काँग्रेसने नुकतेच राज्यसभेवर पाठवले आहे. त्यांच्याकडून क्रीडा क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहे.
चीन, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर भारतातही क्रीडा क्रांती व्हावी, अशी देशवासीयांची अपेक्षा आहे. त्याकरिता केंद्र, राज्य पातळीवर खेळधार्जिण्या योजना आखल्या जाव्यात, मैदाने तयार करावीत, प्रशिक्षक नेमावेत, खेळामध्ये नोकरी मिळते अशी भावना खेळाडूंमध्ये बिंबवली जायला हवी, दुर्लक्षित खेळांची प्रसिद्धी व्हायला हवी, तरच हे शक्य आहे. अशा प्रयत्नांनंतर आलेली पहाट राष्ट्रकुल, ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतासाठी सोनेरी ठरू शकते. तेव्हाच नावाजलेल्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू ‘दंगल’ घालून अव्वल स्थानी विराजमान होतील.