पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यातच सुमद्रात वादळी हवामान असल्याने मासेमारीसाठी किमान दोन हजार बोटी गेल्याने चिंतेचे वातावरण आहे. तर या बोटी वादळामध्ये तटस्थ उभ्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मासेमारीसाठी लागणारा खर्च वाढल्याने रिकामे परत येणे, शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात ७ ते ११ ऑगस्टदरम्यान ताशी ६५ किमी वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला होता. त्यानुसार, किनारपट्टीवर जोरदार पाऊस आणि वारे असे वातावरण सलग काही दिवस कायम आहे. समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याने मच्छिमार संस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली. मात्र या इशाऱ्यानंतरही जिल्ह्यातील सुमारे दीड ते दोन हजार बोटी आजही समुद्रात असल्याची माहिती समोर आली आहे. पालघर, वसई, डहाणू, तलासरी तालुक्यांमधील बोटींचा यात समावेश आहे.
किनारपट्टीवरून मासेमारीसाठी समुद्रात सुमारे आठ ते दहा तास लांब अंतरावर जाऊन मासेमारी न करताच किनाऱ्यावर परतणे डिझेलच्या चढ्या दरांमुळे आणि कामगारांच्या पगारामुळे परवडत नसल्याने या धोकादायक परिस्थितीतही या बोटी समुद्रात ठाण मांडून उभ्या असल्याचे काही मच्छिमारांनी सांगितले. मोसमातील पहिल्याच फेरीसाठी कर्ज काढून मासेमारीला गेलेल्या बोटीला मासेच मिळाले नाहीत, तर मग पुढच्या फेरीसाठी डिझेल, बर्फ, कामगारांच्या पगारासाठी पैसे कुठून आणायचे, अशी चिंता मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.