कणकवली (वार्ताहर) : बिबट्या कातडी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी कडून कणकवली पोलीसांनी बिबट्याची १४ नखे, दोन दात व शिकारीचे शस्त्र आदि साहित्य जप्त केले. पोलीस तपासात आणखी नावे निष्पन होत असुन बिबट्या कातडी व तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सहाय्यक पोलिस निरिक्षक अनिल हाडळ यांनी व्यक्त केली.
आरोपी आप्पा हरिश्चंद्र सावंत (३८), मंगेश पांडुरंग सावंत दोन्ही रहाणार भिरवंडे यानी दोन वर्षापुर्वी नाटळ गावातील जंगलमय भागात शिकार केली होती. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपीचे घर, घटनास्थळी जाऊन निवेदन पंचनामा केला. गुन्हा अन्वेशन विभागाच्या पोलीसांनी गेल्या आठवड्यातील गुरूवारी सापळा रचुन बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी कारवाई केली होती. यावेळी दोन आरोपी सह ३ लाख ५० हजार रूपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त केले होते. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी कणकवली पोलीसांनी चार मुख्य आरोपींना अटक केली होती.
बिबट्याची शिकार करणाऱ्या आरोपी आप्पा हरिश्चंद्र सावंत यांच्या घरातून पोलीसांनी बंदुक, १४ नखे, दोन दात व शिकारी साठी वापरलेली बॅटरी जप्त केली तर मंगेश सावंत याच्या घरातून पोलिसांनी २ चाकू, १ कोयता, १ खोरे व कुदळ जप्त केली. आरोपीनी बिबट्याची शिकार केलेली जागा दाखवण्यासाठी पोलीसांनी अडिज कि. मी. नाटळ जंगलमय भागात नेले. त्याच ठिकाणी बिबट्याचे शव आरोपींनी पुरून ठेवले होते. परंतु आरोपीने दाखविलेल्या ठिकाणी खड्डा खोदूनही बिबट्याची हाड पोलीसांना मिळाली नाहीत.
पोलिसांनी हि शोध मोहिम मंगळवारी व बुधवारी आप्पा सावंत याच्या घरातून पोलीसांनी बंदूक, १४ नखे,व २ दात हस्तगत केले. या शोध मिहिमेत सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल हाडळ, महिला पोलीस उपनिरिक्षक वृषाली बरगे, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे, पांडुरंग पांढरे यांचा सहभाग होता.