मुंबई : कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मेट्रो प्रकल्पासाठी १० हजार कोटी अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहे. या खर्चास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी होता तो आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख रुपयांचा होईल. लॉकडाऊन तसेच कारशेडबाबत निर्माण झालेल्या वादामुळे मेट्रोचे काम रखडले. त्यामुळे आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी १० हजार कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता देखील केंद्र शासनास विनंती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाख वरुन ३ हजार ६९९ कोटी ८१ लाख एवढी होत आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आलेले आहेत. या सुधारित वित्तीय आराखडयानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे (जायका) कर्ज १३ हजार २३५ कोटीवरुन १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख इतके झाले असून वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.
मुंबई मेट्रो मार्ग -३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानकं असून वर्ष २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे. ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ ५० मिनिटात करणे सहज शक्य होणार आहे.
सध्या बोगद्यांचे ९८.६ टक्के एवढे काम झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ७३.१४ हेक्टर शासकीय जमिन व २ .५६ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. फडणवीस यांनी सांगितले की, मेट्रो प्रकल्पाचे जवळपास ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम २०२१ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता वेगाने आम्ही हे काम पूर्ण करू. २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. कारशेडचे काम २९ टक्के पूर्ण झाले आहे. ते अधिक वेगाने पूर्ण केले जाईल. मेट्रोत १३ लाख प्रवासी प्रवास करतील. यामुळे मुंबईच्या रस्त्यावरील ६ लाख वाहने कमी होतील. मुंबईकरांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.