चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नईमध्ये नुकतीच ४४वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली आहे. त्यामुळे आता हे पदक विजेते खेळाडू मालामाल होणार आहेत.
चेन्नईमध्ये झालेल्या ४४व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष ब संघाने कांस्य तर महिला अ संघाने देखील कांस्य पदक जिंकले आहे. महिला संघाने पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये पदकाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाचे नेतृत्व भारताची अनुभवी ग्रँडमास्टर हम्पीने केले होते. भारतीय खुल्या संघात प्रज्ञानंदना, गुकेश, निहाल, रौनक आणि अधिबान यांचा समावेश होता.
खुल्या गटात भारताच्या पुरूष ब संघाने अंतिम फेरीत जर्मनीचा ३-१ असा पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरले. भारतीय ब संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भारताचा टॉप सिडेड महिला अ संघाला ११व्या तसेच अंतिम फेरीत अमेरिकेकडून ३-१ असा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना सुवर्ण पदकापासून वंचित राहावे लागले. अंतिम फेरीत कोनेरू हम्पीच्या नेतृत्वातील भारतीय महिला अ संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.