बच्चू कडू यांचा माध्यमांना सवाल
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आमचा उद्देश मंत्रीपदासाठीचा नाही, मी एवढा लहान विचारांचा माणूस नाही. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रीपदाचा शब्द दिला आहे, तो शब्द ते नक्की पूर्ण करतील एवढा विश्वास आहे. मात्र, नाही दिलं तर भांडायचं का? असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. येणाऱ्या विस्तारात मंत्रीपद देऊ असे ते म्हणाले होते. मात्र, आता काही तांत्रिक कारण असेल, त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आले नाही. कधी कधी दोन पावलं मागे यावं लागतं. त्यामुळे मी अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
आमचे सरकार हे शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत आहे. मै अभी कॅबिनेट से कम नही हूँ, बच्चू कडू अकेलाही काफी है सबके लिए. मला मंत्रीपद दिलं तरी चांगलं आणि नाही दिलं तरी त्यापेक्षा चांगलं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर दिली आहे.
मंत्रीपदाचा विषय तो आमचा हक्क आणि तो आम्ही मिळवणारच. त्याबद्दल शंका नाही. ते आम्हाला मिळणारही आहे, असे बच्चू कडू म्हणाले. हे सरकार मित्रपक्ष आणि अपक्षांशिवाय राहू शकत नाही. त्याचा विचार व्हावा, असे आपले मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.