Thursday, September 18, 2025

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मुंबई : मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज (९ ऑगस्ट) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ६५व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी (झावबावाडी, चर्नी रोड) अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडणारे आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याच स्पर्धा गाजवल्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्रदीप यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात मोकळी पोकळी निर्माण झाली आहे. प्रदीप यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये मोरुची मावशीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.

मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिका यातून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या प्रदीप यांची ओळख मोरुची मावशीमुळे प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती. त्यामुळे त्यांना ओळखले जाऊ लागले. केवळ विनोदी भूमिकाच नाही तर गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. गिरगावात राहणारे प्रदीप हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोरंजन विश्वापासून अलिप्त होते.

प्रदीप यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास सांगायचा झाल्यास पहिल्यांदा उल्लेख करावा लागेल तो मोरुची मावशीचा. त्यानंतर त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

मोरूची मावशी या नाटकाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यासारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.

Comments
Add Comment