अभयकुमार दांडगे
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी त्यांच्यासोबत राहणाऱ्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर खासदारांनी साथ सोडली व आता तर ग्रामीण भागातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख तसेच युवा सेनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते देखील शिवबंधन तोडून शिंदे गटात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठवाड्याच्या भेटीप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील असंख्य पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीनगर येथे भेट दिली त्याप्रसंगीही मराठवाड्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच चित्र मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या भेटीदरम्यान दिसून आले. मराठवाडा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी आता शिंदे गटाची वाट धरली आहे. मराठवाड्यातील माजी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्णपणे ढासळली आहे. मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शेवटची घरघर लागली आहे. ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या नेत्यांच्या घरासमोर सुरुवातीला पोलीस बंदोबस्त लावावा लागला होता. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते नेत्यांच्या घरासमोर तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते; परंतु मराठवाड्यात आता असे आंदोलन करणारे पदाधिकारी व कार्यकर्तेच शिंदे गटात सहभागी होत असल्याने ‘जिथे नेता, तिथे आम्ही’ असे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड व हिंगोली जिल्हा दौरा पूर्वसंध्येवर नांदेडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे तसेच आनंद बोंढारकर या दोघांनीही शिंदे गटात प्रवेश केला. तसेच युवा सेनेच्या तीस पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठवून दिले. संपूर्ण मराठवाड्यात असेच चित्र दररोज तयार होत असल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना मराठवाड्यात जवळपास संपल्याच्या मार्गावर आहे. संभाजीनगर येथील माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच मराठवाड्यातील वसमत येथील शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यासारखी मोजकी नेतेमंडळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत; परंतु हे नेते देखील किती दिवस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहतील हे येणारा काळच सांगणार आहे.
मराठवाड्यात भविष्यात ज्या पक्षाला आपले बळ मजबूत करावयाचे आहे, त्यांनी मराठवाड्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करून मराठवाड्यातील जनतेच्या मनात जागा निर्माण केली, तर त्याचा फायदा निश्चितच भविष्यात त्या पक्षाला होऊ शकतो. मराठवाड्याच्या वाट्याला दोन वेळेस मुख्यमंत्रीपद मिळाले; परंतु त्यावेळेसही मराठवाड्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आजच्या घडीला मात्र मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाला मोठा वाव आहे. महाराष्ट्रातील राजकारणात अलीकडच्या काळात ज्या घडामोडी घडल्या त्याचा परिणाम थेट जनतेच्या मनावर मात्र नक्कीच झालेला आहे. कारण महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाशी आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. महाविकास आघाडी या नावाखाली तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रावर अडीच वर्षं राज्य केले.
शिवसेनेने सरकार स्थापन करत असताना केलेले डावपेच लक्षात घेता हे सरकार किती दिवस टिकेल याचा देखील कोणालाही अंदाज नव्हता, अन् झालेही तसेच अचानक काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर्गत उठाव करत भाजपशी सलोखा साधला. त्यानंतर गेल्या महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले. एकंदरीत या सर्व राजकारणात खूप मोठी उलाढाल झाल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मराठवाड्याला म्हणावा तसा काहीही फायदा झाला नाही. मराठवाड्यातील अनेक प्रश्न आजही ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. सिंचन प्रकल्प असो की अन्य कुठले प्रश्न असो मराठवाड्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे राज्यात पूर्वी असलेल्या महाविकास आघाडीने पूर्णतः दुर्लक्ष केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगर दौऱ्यावर आले व त्यावेळेस त्यांनी संभाजीनगरमधील विविध समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. मराठवाड्यातील हे दोन जिल्हे त्यांच्या बाजूने आहेत. या दोन जिल्ह्यांमधील खासदार हेमंत पाटील व नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर हे दोघेही त्यांच्यासोबत आहेत. या दोन जिल्ह्यांची अवस्था खूप काही चांगली नाही. मराठवाड्याची जशी अवस्था आहे तशीच अवस्था नांदेड व हिंगोली जिल्ह्याची आहे. नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प आजही रखडलेले आहेत. मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढणे गरजेचे आहे.
तसेच मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर विभागीय महसूल कार्यालय नांदेड की लातूर येथे स्थापन करावे हा प्रश्नही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. मराठवाड्यातील रेल्वेचे काही प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून वाट्याची रक्कम न मिळाल्यामुळे रखडलेले आहेत. त्याबाबतही लवकर निर्णय व्हावा. मराठवाड्यात ज्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाहीत त्या ठिकाणी नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळावी, अशी मराठवाड्यातील जनतेची मागणी आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात अॅग्रीकल्चरल महाविद्यालय निर्माण होणे गरजेचे आहे.
तसेच नांदेड येथील आयुर्वेद महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय दर्जाची रसशाळा कार्यान्वित करावी. आयुर्वेद कॉलेजची बारड येथे सुमारे शंभर एकर जागा आहे. त्या ठिकाणी देखील मोठा वाव आहे. मराठवाड्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगर येथे होत होती; परंतु गेल्या दहा वर्षांत संभाजीनगरला राज्य मंत्रिमंडळाची एकदाही बैठक झालेली नाही. तसेच वैधानिक विकास मंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्या देखील लवकरात लवकर झाल्यास मराठवाड्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी खूप मोठा हातभार लागेल. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात या कुठल्याही प्रश्नांना कोणीही हात देखील लावला नाही. वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देणे व त्यानंतर मराठवाड्यातील विविध प्रश्न सोडविणे प्राधान्याने गरजेचे आहे.