महाड (वार्ताहर) : गेली चार दिवस संपूर्ण तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत होता. सोमवारी पासून पावसाचा वेग वाढल्याने सावित्री गांधारी आणि काळ नद्या पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या असून महाड परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने व्यापारी नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे.
मागील वर्षाच्या २२ व २३ जुलैच्या जलप्रलयाच्या आठवणी ताज्या असतांनाच या वर्षी ८ ऑगस्ट पर्यत १९०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच तारखेला २६०९ मि. मी. एवढा पाऊस झाला होता. म्हणजे यावर्षी पाऊस ७०० मि. मी. कमी प्रमाणात नोंदला गेला आहे. सध्या संपूर्ण तालुक्यात कोसळत असलेला पाऊस मागील वर्षाची सरासरी भरून काढण्यासाठी घोंगावत असल्याने तो धोकादायकही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर्षी खुपच उशिराने वरुणराजाचे आगमन झाले होत. जुलै महिन्याच्या सुरुवाती पासून पावसाचा जोर वाढला होता, तो दिर्घकाळ कोसळल्याने जुलै महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होत भात लावणीची कामेही पूर्णत्वास आली होती. मात्र हाच पाऊस जुलै महिन्याच्या अखेर काही दिवसासाठी गायब झाल्याने एक आठवडा उष्म्याच्या लाहिनी नको नको झाल होते. आता चार दिवसापासून पुन्हा वरूण राजा सक्रीय झालाय, तो मागील वर्षाची आपली वार्षिक सरासरी भरून काढण्यासाठीच. महाडकरांनी शेकडो वर्ष पूर पाहिले आहेत तर काही महापूरही त्यांनी अनुभवले आहेत.
महाड शहरात पूर येवून गेल्या शिवाय पावसाळा संपत नाही, अस एक समिकरणच बनल आहे. मात्र २००५ व २०२१ च्या महापुरानी महाडकरांचे कंबरडेच मोडल असल्याने आता महाडकरांना पूर नकोसा झाला आहे. मागील वर्षाच्या जलप्रकोपानंतर शासनाच्या वतीने सावित्री, काळ नद्या मधील गाळ उपसण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. याच गाळ उपसण्याच्या कारणानी कदाचित यावर्षी आता पर्यंत २००० मि. मी. एवढा पासून नोंदवून सुद्धा शहरात पुराचे पाणी शिरलेल नाही. यामुळे आता व्यापारी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र प्रशासनांकडून सर्व प्रकारची नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.