मुंबई (वार्ताहर) : ९ वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी दोन दिवसांपूर्वी सापडल्यानंतर आता मुंबई पोलिस अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षांखालील मुलांचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन री- युनायट” ही मोहीम राबविणार आहे. महिनाभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी नागरिकांची मदत घेण्यात येणार आहे.
अंधेरी येथे राहणारी मुलगी नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाली त्या वेळी तिचे वय पाच वर्षे होते. बेपत्ता होऊन ९ वर्षे उलटल्यानंतर, ती कुठे आहे?, काय करते?, तिचे काय झाले असेल? याबाबत काहीही माहिती नव्हती. ती परत येईल किंवा सापडेल ही आशा तिच्या कुटुंबांनी देखील सोडली होती. मात्र डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अमलदाराच्या चिकाटीने ही मुलगी ९ वर्षांनी अंधेरीतच सापडली. या घटनेची दखल पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी घेतली आणि अनेक वर्षांपासून हरवलेल्या अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी “ऑपरेशन री- युनायट” ही मोहिम प्रत्येक पोलीस ठाण्यात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान एक महिना “ऑपरेशन री- युनायट” ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील हरविलेल्या १८ वयोगटाखालील मुलामुलींचा या उपक्रमादरम्यान शोध घेण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या उपक्रमात नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. आजूबाजूला अशी कोणतीही मुलं दिसली ज्यांच्यावर बळजबरी करून विशिष्ट ठिकाणी वास्तव्य किंवा काम करत असल्याचा संशय आहे, असे कोणतेही मूल दिसल्यास १०० किंवा १०९८ वर कॉल करून कळवा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.