मुंबई : मागील २४ तासात महाराष्ट्रात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकणात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. तसेच पुढील ४८ तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. ११ ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. त्यातच मागील २४ तासात महाराष्ट्रात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टी झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सर्वाधिक ३३० मिमी पावसाची नोंद रत्नागिरीतील लांजा तालुक्यात झाली.
पालघर, रत्नागिरी, पुणे आणि रायगडातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या ठिकाणी रेड अलर्ट कायम आहे, मात्र तो फक्त घाट परिसरासाठीच असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. तसेच पुढील ४८ तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट
मुंबईसह परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुंबईत रात्री अडीच ते सकाळी साडेआठ पर्यंत १०० मिमीहून अधिक पाऊस झाला. सांताक्रूज वेधशाळेत १२४ मिमी तर अंधेरीत १३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र पावसाचा जोर कमी होणार असून १०० मिमीपर्यंतच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिवृष्टी
मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील अतिवृष्टी झाली. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीत २०० मिमी, साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये १९० मिमी पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत १५० मिमी तर लोणावळ्यात १४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मराठवाड्यातही पावसाची हजेरी
तिकडे मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वैजापूर, कन्नड, लोहारा, भोकरदनमध्ये ३० मिमी पावसाची नोंद झाली.
विदर्भात अतिवृष्टीची शक्यता
विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.