विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महापालिकेची स्थापना झाल्यापासून १३ वर्षे झाली. मात्र अद्यापही महापालिकेची भिस्त वसई पश्चिमेतील नवघर या एकाच शवागारावर आहे. वसई पूर्व व पश्चिम विभागासाठी नवघर येथील एकच शवागार असल्याने एखाद्या वेळेस मयतांचा आकडा जास्त असला की मयताचे शवविच्छेदन होईस्तोवर त्याच्या नातेवाईकांना मनस्ताप भोगावा लागतो. त्यामुळे अद्ययावत शवगृहासाठी महापालिकेकडे नागरिकांनी मागणी केली आहे.
वसई पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागाची लोकवस्ती सध्या वेगाने वाढत आहे. मात्र या मोठ्या लोकवस्तीच्या परिसरासाठी नवघर येथे केवळ एकच शवागार आहे. एखाद्यावेळेस प्रेतांची संख्या वाढली की शवविच्छेदनासाठी त्यांना कामण येथील शवविच्छेदन केंद्रात पाठवले जाते. कामण येथे डॉक्टर उपलब्ध नसल्यास पुन्हा नवघर येथे मयताला घेऊन यावे लागते. यात मयताची हेळसांड तर होतेच; मात्र मयताच्या नातेवाईकांचेदेखील हाल होतात. वसईत शवविच्छेदनाची व्यवस्था होऊ न शकल्यास मृत्ताच्या नातेवाईकांना मुंबई गाठावी लागते. यात नागरिकांचा बराचसा वेळ व पैसा वाया जातो.
महापालिकेची स्थापना झाल्यापासून महापालिकेने अद्यावत शवगृह नसल्याने मयतांना मृत्यूनंतरदेखील यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे अद्यावत शवागारासाठी पालिकेकडे मागणी होत आहे.