
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार अखेर आज सकाळी ११ वाजता राजभवन येथे पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.
याआधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्याला प्रतीक्षित असलेल्या शिंदे गट आणि भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून मात्र तानाजी सावंत वगळता अन्य सर्व ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातीलच नेत्यांना संधी देण्यात आली आहे.
स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, यात वादग्रस्त संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांचा समावेश आहे. या मंत्रीमंडळात एकाही महिलेला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. यावरून येणाऱ्या काळात सरकारला टीकेला सामोरे जावे लागू शकते.
भाजपचे मंत्री
१. सुरेश खाडे, २. चंद्रकांत पाटील ३. राधाकृष्ण विखे ४. गिरीश महाजन ५. अतुल सावे ६. रवींद्र चव्हाण ७. विजयकुमार गावित ८. सुधीर मुनगंटीवार ९. मंगलप्रभात लोढा
शिंदे गटाचे मंत्री
१. दादा भुसे २. संदीपान भुमरे ३. उदय सामंत ४. शंभूराज देसाई ५. गुलाबराव पाटील ६. अब्दुल सत्तार ७. संजय राठोड, ८. दीपक केसरकर ९. तानाजी सावंत