Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्रजळगाववासियांच्या सेवेसाठी १०० नव्या ई बसेस दाखल होणार

जळगाववासियांच्या सेवेसाठी १०० नव्या ई बसेस दाखल होणार

जळगाव (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाने ई– बस ही संकल्पना सुरू केली आहे. यातून प्रत्येक विभागासाठी या बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार जळगाव विभागासाठी शंभर ई– बसचा प्रस्ताव आहे. जिल्ह्यात एसटी परिवहन विभागातील ११ आगारात सुमारे ८०० च्या वर बसेस प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. आता डिझेलच्या बसेस जावून १०० नव्या ई-बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच दाखल होणार असल्याची माहिती जळगाव एसटी विभागाने दिली. यामुळे प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे.

शहरी, तालुकास्तरावर तसेच लहानातील लहान गावात ‘गाव तिथे एसटी’, प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीद वाक्यानुसार दरवाजा, खिडक्यांच्या खडखडाट करीत प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचवणारी ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार आहे. एसटी परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागात १०० ई- बसेस लवकरच दाखल होणार आहेत. नव्या बसेस इलेक्ट्रीक चार्जिंगयुक्त आहे. एसटीच्या ७५ व्या वर्धापन दिनी एक जून रोजी पुणे, मुंबई सारख्या महानगरात इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार महामंडळ प्रशासनाने जिल्ह्याच्या व्याप्तीनुसार बसेस देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिवहन विभागाकडून ४९ बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून १०० ई-बसेस मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. नीम आराम बसच्या प्रवासी भाड्यानुसार या ई- बसेससाठी प्रवासी भाडे आकारणी होईल. या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी, सुखकारक प्रवास सुविधा मिळेल, अशी माहिती एसटी विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -