विकमगड (वार्ताहर) : जलजीवन मिशनअंतर्गत विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायतींना मुबलक पाणी मिळणार आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा संकल्प आखण्यात आला आहे. पहिल्या पट्ट्यात दहा ते पंधरा गावांना जलजीवन मिशनअंतर्गत योजना मंजूर झाल्या आहेत.
केंद्राकडून जलजीवन मिशनअंतर्गत हर घर नल से जल हा मानस डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने या योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील गावपाड्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. या योजने अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून विक्रमगड तालुक्यातील ४२ ग्रामपंचायती अंतर्गत ९४ गाव खेड्या अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या यंत्रणेद्वारे मोठ्या प्रमाणात या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.
विक्रमगड तालुक्यात दादडे, वेहलपाडा तलावली, तलवाडा, डोलारी बुद्रुक, उपराळे, बांधन, ओंदे वाकी, भोपोली, बोराडा अशा दहा ते पंधरा गावांना या जलजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर झाल्या असून साधारण एक कोटीच्या आसपास यांचे अंदाजपत्रक असणार आहे. या योजना येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. या योजना निविदा स्तरावर असून येणाऱ्या दिवसांमध्ये त्या कार्यान्वित होणार आहेत.
या योजनांमुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. या अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा संकल्प पूर्ण होणार आहे. जलजीवन मिशन ही ५५ लिटर दरडोई या निकषावर अंमलात आली आहे. त्यामुळे या भागातील प्राणी प्रश्न सुटणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये या योजना मंजूर झाल्या असल्या तरी या योजना ठरवलेल्या कालावधीमध्ये कशा पूर्ण होतील, याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
या भागांमध्ये जलस्वराज, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, मुख्यमंत्री पेजल योजना अशा अनेक योजना या भागात मंजूर झाल्या. परंतु यामध्ये अनेक योजना आजही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे शासनाचे करोडो रुपये खर्च होऊन ही लोकांना आजही या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अनेक गाव पाडे या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण नळ पाणीपुरवठा विभागाने या योजना कशा पूर्ण होतील व लोकांना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.