मुंबई (प्रतिनिधी) : वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणी बागेत गेल्या काही महिन्यांपासून विविध बदल करण्यात आले असून नवीन प्राणी देखील आणले जात आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून सिंहाच्या प्रतीक्षेत असलेल्या राणी बागेला आणखी काही वेळ थांबावे लागणार आहे.
इस्रायलकडून झेब्रा खरेदी करण्याचा पालिकेचा प्रस्ताव फॉरेन ट्रेड्स महासंचालकांनी फेटाळला आहे. त्यामुळे भायखळा प्राणीसंग्रहालय प्राधिकरण आता झेब्र्याकरिता इतर देशाच्या शोधात आहे. तो मिळाल्यानंतर गुजरातला झेब्रा देऊन सिंह घेण्यात येणार आहे. मात्र आता झेब्राचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे राणी बागेत सिंह येण्यासाठी देखील उशीर होणार आहे.
राणी बागेत पूर्वीपासून तीन सिंह होते. मात्र वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर २०१४ पासून राणीबागेत सिंह नाही. यासाठी आता राणी बागेचे नुतनीकरण सुरू असताना राणी बागेत सिंह आणण्याचा निर्णय पालिकेने आणि राणी बाग भायखळा प्राधिकरणाने घेतला होता. यासाठी जुनागढ सक्करबाग गुजरातमधील प्राणिसंग्रहालय आणि इंदूरमधील कमला नेहरू प्राणिसंग्रहालय येथून पांढरा सिंह घेण्याची योजना आखली होती. त्या बदल्यात राणी बागेकडून झेब्रा देण्यात येणार होता.
त्यासाठी थायलंडमधील गोट्रेड फार्मिंग कंपनी लिमिटेडला या झेब्र्याची खरेदी आणि वाहतूक करण्याचे कंत्राटही देण्यात आले होते. दरम्यान याबाबत प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता हा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे. इस्रायलला आफ्रिकन हॉर्स सिकने अधिकृत दर्जा नसल्याने केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे आता महापालिकेला झेब्रासाठी इतर देश शोधावा लागणार आहे. जो पर्यंत गुजरातमधील प्राणीसंग्रहालयला झेब्रा दिला जात नाही, तो पर्यंत राणी बागेला सिंह मिळणार नाही. यामुळे सिंहाची प्रतीक्षा लांबणार आहे.