मुंबई : युती सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर सतत चर्चा, टीका-टिपण्णी सुरु असतानाच अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. उद्या सकाळी ११ वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.
राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात तूर्तास छोटेखानी विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील प्रलंबित सुनावणीमुळे हा सावध पवित्रा घेतल्याची चर्चा रंगली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.