मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२१ च्या तुलनेत यंदा स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या तीन पटीने वाढली आहे. मागील सात दिवसांत स्वाईन फ्लूचे ८० रुग्ण आढळले आहेत. जुलैपासून आतापर्यंत १८५ रुग्ण आहेत. जुलै महिन्यात १०५ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. परंतु, जून महिण्यापासून मुंबईत स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळत आहेत. १ जून ते ७ ऑगस्टपर्यंत मुंबईत १८९ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. २०२१च्या तुनेत ही संख्या तीन पटीने जास्त आहे. २०२१ ला मुंबईत स्वाईन फ्लूचे ६४ रूग्ण आढळले होते.
मुंबईत वाढत्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेकजण सर्दी, तापाने त्रस्त होताच रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहेत. बहुतेक लोक सर्दी आणि ताप यासारख्या संसर्गाने त्रस्त आहेत. लहान मुलांमध्ये हात, पाय आणि तोंडाचे आजारही समोर येत आहेत. स्वाईन फ्लूसह मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरीयाच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. मागील सात दिवसात मुंबईत गॅस्ट्रोचे ११९ रुग्ण आढळे असून १ जूनपासून ७ ऑगस्टपर्यंत गॅस्ट्रोचे ३ हजार ७०४ रूग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत मागील काही दिवसांपासून मलेरीयाचे २१८ रूग्ण आढळून आले आहेत. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, थ्रोट इन्फेक्शन, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी आणि डायरीयासारखी लक्षणे दिसत आहेत.