बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : महिला क्रिकेटसह पुरुष हॉकीतही ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने भारताचे सुवर्ण पदक हुकले. अंतिम सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून ७-० असा पराभूत झाला. त्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन, जेकब अँडरसन आणि यांनी प्रत्येकी २ गोल केले. तर टॉम विकहम, ब्लॅक गोव्हेर्स, फ्लिन ओगलव्ही यांनी प्रत्येकी १ गोल केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये २, दुसऱ्या क्वार्टरमध्ये ३ तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये १ आणि चौथ्या क्वार्टरमध्ये १ गोल केला. भारताला ऑस्ट्रेलियाचे आक्रमण मोडून काढत एकही गोल करता आला नाही. ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल स्पर्धेत सातव्यांदा सुवर्ण पदक जिंकले.
सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलपोस्टवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. पहिल्याच क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने दोन गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आपला आक्रमक धडाका कायम ठेवला. यामुळे भारताच्या बचाव फळीवर चांगलाच दबाव आला होता. दरम्यान, गोलकिपर श्रीजेशने आपला अनुभव पणाला लावत अनेक गोल चांगले सेव्ह केले होते. मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने अजून दोन गोल करत सामन्यात ४-० अशी आघाडी घेतली. दुसरे क्वार्टर संपता संपता ऑस्ट्रेलियाने अजून एक गोल दागत दुसऱ्या क्वार्टर अखेर ५-० अशी मोठी आघाडी घेतली.
पहिल्या दोन क्वार्टरमध्येच ५-० असा पिछाडीवर पडलेल्या भारताला ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्वर्टरमध्ये अजून एक गोल दागत आघाडी ६-० अशी केली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकच गोल दागला. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने एक गोल दागत ७-० अशी आघाडी घेतली.