मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. न्यायालयाने राऊतांना घरचे जेवण आणि औषधे देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप ईडीकडून लावला जात असून विविध अकाउंटवरून राऊतांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर एक कोटीपेक्षा जास्त पैसे आल्याचा आरोप केला जात आहे. पत्राचाळ प्रकरणातील या अवैध पैशांमधून त्यांनी अलिबागमध्ये जमीन घेतल्याचा आरोप केला जात असून, ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावल्यानंतर त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.