सुभाष म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाने दहा दिवस दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने परत एकदा दमदारपणे आगमन केल्याने शेतकरी सुखावला असून, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १०३.०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पावसाची संततधार सुरूच असून, गेल्या चोवीस तासात मुरूड, माणगाव, रोहा, सुधागड, तळा, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धनला चांगलेच झोडपून काढल्याने येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी असल्याचे कोलाड पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता तसेच पूरनियंत्रण कक्ष अधिकारी यांनी कळविले आहे. गेल्या चोवीस तासात मुरूड, माणगाव, रोहा, सुधागड, तळा, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यांना चांगलेच झोडपून काढल्याने तेथील सखल भागासह शेतजमिनी काही काळ पाण्याखाली होत्या. तसेच तुफानी पावसामुळे तेथील जनजीवनही ठप्प झाले होते.
मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक मौसम केंद्राने दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसात जोरदार अतिवृष्टीचे संकेत दिले होते. पैकी ७ व ८ ऑगस्ट हे दोन दिवस रेडअलर्ट, तर ९,१०,११ हे तीन दिवस ऑरेंज अलर्ट म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे सर्वांनीच दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १०३.९० मिलीमीटर पाऊस पडला. अलिबागला ३३, पेण ५२, मुरुड १०२, पनवेल ७३.६०, उरण ३८, कर्जत ४५.२०, खालापूर ६५, माणगाव १२१, रोहा १४५, सुधागड ७२, तळा १८२, महाड ८९, पोलादपूर ११३, म्हसळा २१३, श्रीवर्धन २४१, तर माथेरान येथे ७३ मिलीमीटर पाऊस पडला. १ जून ते ८ ऑगस्टपर्यंतच्या काळात एकूण सरासरी २०४८.६३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. मागीलवर्षी ८ ऑगस्टपर्यंत एकूण सरासरी २६३३.२१ मिलीमीटर पाऊस पडला होता.
रायगड जिल्ह्यात मधल्या काळात समाधनकारक पाऊस न पडल्याने भातरोपांना त्याचा फटका बसू लागला होता. मात्र शुक्रवारपासून पावसाने परत एकदा हजेरी लावल्याने भात पिकाच्या लावण्या पूर्ण होण्याबरोबरच भातपीक फुटवे फुटण्याच्या सद्यस्थितीत आहे. मात्र अशा परिस्थितीत काही दिवस जोरदार अतिवृष्टी झाल्यास भातपीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. – दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक.