खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात रविवार दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील सुमारे २१ गावांचा खेड तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू होते.
पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांत रघुवीर घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. वारंवार दरड कोसळू लागली असल्याने कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यात शिंदी, वाळवण, आकल्पे यांसारखी सुमारे २१ गावे आहेत. महाबळेश्वर आणि कांदाटी खोरे यामध्ये कोयना धरणाच्या बॅकवॉटरमुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जायचे झाल्यास होडीतून जावे लागते. पावसाळ्यात होडीतून जाणे शक्य होत नसल्याने पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना रघुवीर घाटमार्गे खेड व तेथून पोलादपूरमार्गे महाबळेश्वर येथे जावे लागते. या गावांचा त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून प्रवास होत असतो. ग्रामस्थ शासकीय काम वगळता अन्य दैनंदिन कामासाठी महाबळेश्वरला जाण्याऐवजी खेड तालुक्यात येणे पसंत करतात. त्यामुळे रघुवीर घाट कांदाटी खोऱ्यात ग्रामस्थांसाठी जगाशी संपर्क ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
खेड एसटी आगाराची खेड-आकल्पे ही बस प्रवाशांची ने-आण करत असते. तर मुंबईहून या खोऱ्यात येणाऱ्या एसटीच्या बसेस देखील रघुवीर घाटातूनच कांदाटी खोऱ्यात जात असतात. कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांना उपयुक्त असणारा रघुवीर घाटाचा काही भाग गत वर्षीच्या अतिवृष्टीत ढासळला होता. त्यामुळे या घाटातील वाहतूक बंद करावी लागली होती. पावसाळ्यात कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने ढासळलेल्या रघुवीर घाटाची डागडुजी करायला हवी होती. मात्र बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या वर्षी ग्रामस्थांना वारंवार दळण-वळणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.