Saturday, January 18, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखनरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

शनिवारी पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय ही एक औपचारिकताच होती. त्यांनी यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८, तर अल्वा यांना १८२ मते पडली. तसेच १५ मते अवैध ठरली. जगदीप धनखड ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला होता.

द्रौपदी मुर्मू यांना ५४० खासदारांची मते मिळाली, तर यशवंत सिन्हा यांना २०८ खासदारांनी मतदान केले, तर १५ खासदारांची मते बाद झाली. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोनच गोष्टींमध्ये साम्य पाहावयास मिळाले. एक म्हणजे देशातील कानाकोपऱ्यांतील लोकप्रतिनिधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर असलेला विश्वास. देशातील सर्वच राजकीय नेतृत्वांमध्ये नरेंद्र मोदींच्या जवळपासही फिरकण्याची कोणाची क्षमता नसल्याचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झालेले आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी १५ मते अवैध ठरली, ही संसदीय लोकशाहीच्या वाटचालीसाठी खऱ्या अर्थांने चिंताजनक बाब आहे.

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांची भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाणा या गावात झाला. चार भावंडांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण किठाणा गावातील शासकीय माध्यमिक विद्यालयातून झाले. गावातून पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गरधना येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला. पुढे त्यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमध्येही शिक्षण घेतले. बारावीनंतर त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. पुढे त्यांची आयआयटी आणि नंतर एनडीएसाठी निवड झाली होती. मात्र त्यांनी प्रवेश घेतला नाही. पदवीनंतर त्यांनी देशातील सर्वात मोठी नागरी सेवा परीक्षाही उत्तीर्ण केली होती. मात्र आयएएस होण्याऐवजी त्यांनी कायद्याचा व्यवसाय निवडला. राजस्थान उच्च न्यायालयातून त्यांनी वकिली सुरू केली. ते राजस्थान बार कौन्सिलचे अध्यक्षही होते.

धनखड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जनता दलमधून केली. १९८९ मध्ये झुंझुनूमधून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९८९ ते १९९१ या काळात व्ही. पी. सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होते. मात्र १९९१च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने जगदीप धनखड यांचे तिकीट कापल्याने त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९९३ मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. २००३मध्ये त्यांचे काँग्रेसमध्येही मदभेद झाले आणि त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले. आता त्यांची देशाचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. ते ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. धनखड यांच्यापूर्वी सर्वपल्ली राधाकृष्ण, झाकिर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, गोपाल स्वरूप पाठक, बी. डी. जत्ती, मोहम्मद हिदायत उलाह, रामस्वामी वेंकटरामन, शंकर दयाळ शर्मा, के. आर. नारायणन, कृष्णकांत, भैरोसिंग शेखावत, मोहम्मद हमीर अन्सारी, व्यंकय्या नायडू यांनी देशाच्या उपराष्ट्रपतीपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. या उपराष्ट्रपतींपैकी केवळ सर्वपल्ली राधाकृष्ण, झाकिर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, रामस्वामी वेंकटरामन, शंकर दयाळ शर्मा, के. आर. नारायणन या सहा जणांनाच देशाच्या
राष्ट्रपतीपदावर विराजमान होता आले.

बाकीच्यांना उपराष्ट्रपतीपदावरच समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या दोन्ही निवडणुकांवर नजर टाकली असता, एक गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे सत्ताधारी घटकांकडून विरोधी घटकांच्या उमेदवारांचा दणदणीत व एकतर्फी पराभव केलेला आहे. या गोष्टीचे श्रेय केवळ भाजपला पर्यायाने केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावालाच जात आहे. अर्थात विरोधी पक्ष कमजोर असणे, हतबल असणे ही देशाच्या लोकशाहीसाठी भूषणावह नाही, तर चिंताजनक बाब नक्कीच आहे. अर्थात या परिस्थितीला देशातील विरोधी पक्षही तितकेच जबाबदार आहे. आज देशातील विरोधी पक्षाचे जे नेतृत्व करत आहेत, त्यांनी २०१४ पूर्वी मोदी पर्वाचा केंद्रात उदय होण्यापूर्वी देशाचा कारभार चालवित होते. अर्थात अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालावधीचा त्यास अपवाद मानावा लागेल. कालच्या सत्ताधाऱ्यांनी विकासाची गती न पकडल्याने, सातत्याने भ्रष्टाचार केल्याने व केवळ निवडणुकांमध्ये भावनेला हात घालत जनतेची दिशाभूल केल्याने भारतातील जनतेने यांना सत्तेवरून दूर करत विरोधी पक्ष नेतेपदही न मिळण्याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. नरेंद्र मोदी या नावाची, या नावाच्या कर्तृत्वाची जादू आजही भारतीयांच्या मनावर आहे व आज मोदी राजवट देशकल्याणासाठी करत असलेले कार्य पाहून आणखी कित्येक वर्षे नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला कदापि ओहोटी लागणार नाही. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांच्या मतांची जमाबेरीज केल्यास त्याहूनही अधिक मते मुर्मू व धनखड यांना मिळालेली आहेत. याचाच अर्थ विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे व कार्याचे आकर्षण आहे. राज्याराज्यांतील आमदार, विविध पक्षांची नेतेमंडळी मोठ्या संख्येने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये सामील होत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास नजीकच्या भविष्यात देशामध्ये विरोधी पक्षाचे अस्तित्व हा संशोधनाचा विषय बनलेला आहे. ही अतिशयोक्ती नसून सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची असलेली वाटचाल वस्तुस्थिती स्पष्ट करत आहे. आपल्या कार्यप्रणालीवर नरेंद्र मोदी एकीकडे देशवासीयांचा जनाधार प्राप्त करत असताना विरोधी पक्षाला आपल्या अकार्यक्षमतेमुळे जनाधार गमवावा लागला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -