रत्नागिरी (वार्ताहर) : जिल्ह्यात दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने काजळी, जगबुडी, वाशिष्ठी नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. आता बावनदीने धोका पातळी ओलांडल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील हा ब्रिटिशकालीन पूल असल्याने धोका संभवतो. या महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते.
त्यामुळे कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी एक पोलीस आणि एक होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. पोलीस या जीर्ण पुलावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. वाहतूक खोळंबू नये यासाठी संगमेश्वर पोलिसांतर्फे काळजी घेतली जात आहे. बाव नदीच्या पात्राबाहेर पाणी गेल्याने सप्तलिंगी, वांद्री, मानसकोंड, तळे कांटे, कोळंबे, परचुरी, आंबेड आदी भागात पुराचे पाणी भातशेतीत भरले आहे.
ओझरखोल येथे पऱ्याला तुंब मारल्याने नदीसह पऱ्याचे पाणी भातशेतीत घुसल्याने भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसकोंड, परचुरी, कोळंबे या ठिकाणी ही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वांद्री येथील घरांना पुराचा धोका संभवतो. येथील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.