Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीमराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा - उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा – उदयनराजे भोसले

मुंबई : मराठा आरक्षण हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासंदर्भात फक्त घोषणा होत असतात, पण वस्तुस्थितीत रूपांतर होत नाही, असा खेद खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाची मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता सरकारला थेट ९ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मराठा आरक्षणाशिवाय निवडणुकांचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू असाही इशारा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केले. सोमवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच, मराठा आरक्षणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासंदर्भात फक्त घोषणा होत असतात, पण वस्तुस्थितीत रूपांतर होत नाही. सगळ्यांना आशा आहे की, शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. कुठल्याही समाजाच्या लोकांवर अन्याय न होता, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.”

दुसरीकडे, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याने या भेटीचा संबंध मंत्रिमंडळ विस्ताराशी लावला जात आहे. उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद हवे आहे का? अशा चर्चांनाही उधाण आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षानुवर्षापासून मराठा आरक्षणाचे घोंगडे हे भिजत पडलेले आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलने झाली आहेत. छत्रपती संभाजी राजे यांनीही त्यासाठी राज्यभर दौरे करत मराठा समाजाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. मुंबई ते दिल्ली अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. तसेच कोर्टातील लढाई लढली गेली आहे. मात्र तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न हा निकालात निघू शकलेला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -