मुंबई (प्रतिनिधी) : वीर जिजामाता भोसले उद्यानाचा (राणी बाग) कायापालट करण्यासाठी उद्यानात अत्याधुनिक पिंजरे उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. या कामासाठी काढलेल्या निविदांमध्ये २९१ कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे करत याबाबतची तक्रार दाखल केली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी पालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली असता आयुक्तांनी ही परवानगी नाकारली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे प्रकरण दप्तरी दाखल करत चौकशी थांबवली असल्याचे समोर आले आहे. राणीबागेचा कायापालट आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पालिकेने राणी बागेत विविध बदल केले आहेत. यासाठी पालिकेने काढलेल्या निविदेमध्ये २९१ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे गेले. मात्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या विरोधात चौकशीसाठी पालिकेने परवानगी मागितली असता पालिका आयुक्तांनी मात्र ही परवानगी नाकारली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण दप्तरी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान यासाठी आपण पुन्हा एकदा आयुक्तांना पत्र लिहून चौकशीसाठी परवानगी देण्याची मागणी करणार असल्याचे विनोद मिश्रा यांनी सांगितले.