मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या सदरात ईडी कोठडीत असलेल्या संजय राऊत यांचा लेख छापून आला होता. या लेखाची आता ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाची परवानगी असल्याशिवाय राऊत कोठडीतून लेख लिहू शकत नाहीत. राऊतांनी अशाप्रकारची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा राऊत यांनी ‘रोखठोक’मधून समाचार घेतला होता. यात “राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे,” असे संजय राऊत लेखात म्हणाले होते.