नाशिक (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. एरवी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या हारासाठी आता ५० रुपये मोजावे लागत आहेत. भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेलाला अधिक मागणी आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे कपालेश्वरासह पंचवटीतील सर्वच मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत.
श्रावण महिना सुरू असल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे झेंडूसह सर्वच फुलांच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे दहा रुपयांत उपलब्ध असलेला मिक्स फुलांचा वाटा २० रुपयांत, तर २० ते ३० रुपयांना मिळणारा फुलांचा हार आता ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
शंभर रुपयांत हार
फुलांच्या दरात वाढ झाल्याने छोटे हार ५० रुपये, तर मोठ्या हारांची किंमत शंभर रुपयांपलीकडे पोहोचली आहे. फुलांच्या दरात वाढ झाल्याने हारांच्या किमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेते सांगतात.
अर्थकारणाला बुस्ट
श्रावण महिन्याचे औचित्य साधत पंचवटीतील अनेक मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. रामकुंडासह श्री कपालेश्वर, श्री काळाराम दर्शनासह भाविकांची पसंती निसर्गरम्य तपोवनालाही मिळत आहे. यानिमित्त पंचवटीच्या अर्थकारणासही काही प्रमाणात बुस्ट मिळाला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे येथील मंदिरांसह सर्वच व्यवहार ठप्प झाले होते.
फुलांचे दर असे
- गुलाब : २० ते २५ रुपयांला १२ फुलांची गड्डी
- शेवंती : २०० रुपये किलो
- झेंडू : १२० रुपये किलो
- ॲस्टर : २०० रुपये किलो
- निशिगंध : २०० रुपये किलो