भाईंदर (वार्ताहर) : केरळ राज्यातील किनाऱ्यावरून अरबी समुद्रात आलेल्या वादळामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी माघारी परतू लागल्या असून भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावरून गेलेल्या सर्व बोटी चौक जेटी व गोराई मनोरी – मालाड खाडीच्या आश्रयाला आहेत.
भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावरून ६ व ७ ऑगस्टला मासेमारी करणाऱ्या बोटी आपल्या जीवाची पर्वा न करता डिझेल, बर्फ,व इतर साहित्य घेऊन समुद्रात मासेमारीसाठी निघाले होते. दरम्यान केरळ राज्यातील किनाऱ्यावरून अरबी समुद्राकडे कूच करणारे वादळ ८ व ९ रोजी अरबी समुद्रात येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
मासेमारी बोटीना वादळाची चिन्हे दिसू लागताच बोटी माघारी परतू लागल्या आहेत. मासेमारीचा मोसम सुरू झाला असतानाच वादळाच्या संकटामुळे बोटीवरील खलाशांचा रोजगार बुडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सुद्धा वादळामुळे त्यांचा रोजगार बुडाला होता. गेल्या वर्षी मासेमारीच्या मोसमात तौक्ते वादळ आले होते. खलाशांचा रोजगार बुडाला होता. त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नव्हती. त्यामुळे मासेमारी करणारा कोळी समाज केंद्र व राज्य सरकारवर नाराज आहेत.