नाशिक (प्रतिनिधी) : दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच ते सहा वर्षापासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून सतत होणारे बिबट्याचे हल्ले यामुळे तालुक्यात अनेक गावातील जनजीवन विस्कळीत होऊन यांचा शेती व्यवसायसह शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होताना दिसून येत आहे.
दिंडोरी तालुक्याचा कादवा नदी परिसर व कोलवण नदी परिसर हे बिबट्याचे जणू माहेर घर झाले आहे. या परिसरामध्ये जंगल नसले तरी मुबलक पाणी व वास्तव्यासाठी उसाची शेती त्यामुळे येथे बिबट्याची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आजही अनेक ठिकाणी उसाच्या शेतामध्ये मादी आपल्या बछड्यांसह वास्तव्यात आहे. त्यामुळे ऊसाची मशागत व खत व्यवस्थापन करण्यास शेतकरी वर्गास मोठा अडथळ निर्माण झाला आहे.
तालुक्यातील म्हेळुस्के परमोरी निळवंडी, लखमापूर येथे नरभक्षक बिबट्याने लहान मुलांवर हल्ले करून जीव घेतला आहे. दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ पशुधन धोक्यात त्यात सध्या बिबट्यांनी आपला मोर्चा पाळीव प्राण्याकडे वळविल्यामुळे रोज कुठे ना कुठे हे बिबटे गाय, म्हैस, वासरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या कुत्रे यांना आपले भक्ष करताना दिसत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी लहान मुलावर हल्ले होवूनही हे बिबटे मात्र पिंज-यात कैद झालेच नाही.
वाडी वस्त्यावर मळ्यात राहणा-या लोकांना या बिबट्याच्या दहशतीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यात तालुक्यात अनेक ठिकाणी वाड्यावस्त्यांवर राहणा-या कुटुंबांना सिंगल फेज विजेची सोय नसल्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे. हे कुंटुंब रात्रीच्या वेळी पशुधनाच्या सुरक्षितेसाठी घराबाहेर पडू शकत नाही. अनेका वेळा तर बिबट्या रात्री घरासमोर आला तरी लोक बाहेर पडू शकत नाही. एवढी दहशत बिबट्याने निर्माण केली आहे.
ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आहे, अशा ठिकाणची लहान मुले शाळेत जाण्यास सुद्धा घाबरतात त्यांत निळवंडी येथील शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्यामुळे मळ्यात राहणा-या शाळकरी मुलामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील कोळवण नदी परिसरातील वाघाड, निळवंडी, पाडे, वलखेड, हातनोरे, निगडोळ तसेच दिंडोरी शहरातील जाधव वस्ती तर कादवा नदी परिसरातील नळवाडी, पिंपरखेड, खेडले, करंजवण, ओझे, लखमापूर, दहेगाव, वागळुद, म्हेळुस्के, कादवा माळूगी, अवनखेड, परमोरी या गावामध्ये बिबट्याने धुमाकुळ घालून आपली दहशत निर्माण केली असून या परिसरामध्ये कायमच बिबट्याचे लहान मोठे हल्ले होतच राहतात. त्यात वनविभागाकडे पिंज-याची संख्या मर्यादित असल्यामुळे खूपदा मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहे. खूप वेळा तर लवकर पिंजरा उपलब्ध होत नाही आणि झाला तर बिबट्या पिंज-यात प्रवेश करीत नाही हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे.
सध्या बिबट्याने आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळविला आहे त्यात आता बिबट्याने गावात प्रवेश करू नागरिकांनाच आव्हान दिले आहे. आदिवासी वस्तीमध्ये अनेक कुटुंब शेळीपालनाचा व्यवसाय करतात, मात्र बिबट्याने थेट गावात प्रवेश केल्यामुळे आदिवासी बांधवांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सध्या बिबट्या वॉल कंपाऊंडला सुद्धा जुमानत नसून उडी मारून आत प्रवेश करत आहे. एवढी दहशत बिबट्याने पसरविली आहे. सध्या तालुक्यात भाजीपाला लागवडीचा मोठा हंगाम सुरू असून बळीराजाला अनेक ठिकाणी रात्रीचा वीज पुरवठा दिला जात असल्याने बिबट्यामुळे पिकांना पाणी देणे सुद्धा शक्य होत नाही. या बिबट्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर विपरित परिणाम होत असताना तालुका वनविभागाने व प्रशासनाने बघायची भूमिका न घेता तालुक्यात पिंज-याची संख्या वाढविण्याची आवश्यकता असून वनविभाग व प्रशासन किती बळी गेल्यानंतर पिंज-याची संख्या वाढवणार अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.