मुंबई (प्रतिनिधी) : बहिण- भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ठिकठिकाणच्या बाजारापेठा राख्यांनी सजलेल्या दिसत आहेत. पण यंदा राख्यांच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे राखी खरेदी करताना बहिणींना अधिकच पैसे मोजावे लागणार आहेत.
कोरोना आटोक्यात आल्याने व निर्बंध हटविल्याने दोन वर्षांनी आलेल्या रक्षाबंधनासाठी यावेळी लोकांमध्ये आणि व्यवसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष राखी विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने ग्राहकांमध्येदेखील रक्षाबंधनाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून कोलमडलेला राखीचा व्यवसाय आता या महामारीतून पूर्णपणे सावरला आहे.
कोरोनापूर्वीच्या तुलनेत यंदा व्यवसाय वाढलेला दिसत आहे. दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त भुलेश्वर, मशीद बंदर आणि शीव धारावी येथे राख्या तयार केल्या जातात. या राख्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा चीनमधुन येत असे. पण चीनच्या मालावर बंदी घातल्यामुळे कच्च्या मालाच्या साहित्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा बाजारात राख्या महागल्या आहेत. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्री अधिक झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
आतापासूनच किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. सुमारे ५० टक्क्याने ग्राहक वाढले असल्याची माहिती व्यवसायिकांकडून देण्यात आली. कुंदन वर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे. चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आले आहे.
“परिस्थिती सामान्य असल्याने यंदा राख्यांना मागणी वाढली आहे. त्या प्रमाणात आवक कमी आहे. महागाईमुळे ४० टक्क्यांनी दर वाढले आहेत.” – राजेंद्र जैन व्यावसायिक
असे आहे राखींचे प्रकार आणि किंमती
साधी आणि स्पिनर लायटिंग ४० ते ६५
लाकडी – ३० ते ४०
कुंदन वर्क – २० ते ११०
मोती – १० ते ५०
जरदोशिवर – ३० ते ३५
चिडा, लुब्बा – २२ ते ५०
कपल राखी – ४० ते ५०
पपेट – ५० ते ६०
कडा – १६५
देवराखी एक डझन – ०५
चांदी पॉलिश राखी – १२ ते १००