नाशिक (प्रतिनिधी) : पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी सापांनी तयार केलेल्या बिळांमध्ये शिरते. परिणामी साप आणि नाग बाहेर पडून अन्न शोधत असतात. त्यामुळे सर्पदंशाचे प्रकार बघायला मिळतात. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता एकूण ३२२ सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे जून म्हणजेच पावसाळ्यात दाखल झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नदी, नाले वाहू लागले असताना जमिनीमध्ये देखील पाणी मुरत आहे. त्यामुळे बिळांमध्ये पाणी शिरल्याने अडगळीच्या विसाव्याला असलेले साप बिळाबाहेर पडत आहेत. त्यामुळे सर्पमित्रांना पकडण्यासाठी बोलविण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच घरगुती उपचार न करता तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे. घरगुती उपचार करू नये, शेतातील कामे करताना किंवा रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना बॅटरीचा वापर करावा, तसेच साप दिसल्यास सर्पमित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्रांकडून केले जात आहे.
सर्पदंश झाल्यावर तातडीचा उपचार
सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच अनेकजण घाबरून जातात, त्यामुळे प्रकृती अधिक बिघडते. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच सर्वप्रथम रुग्णाला जवळच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करावे. घराच्या घरी उपचार करू नये, जखम जंतुनाशक औषधाने धुवावी.
औषध साठा उपलब्ध
सर्पदंशावरील औषध साठा उपलब्ध जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात सर्पदंशावरील औषध साठा उपलब्ध आहे. सर्प देश झालेल्या रुग्णावर तत्काळ उपचार करण्यात येतात, असे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.