अर्चना सोंडे
कोरोना काळात अर्थात २०२० साली आपल्या देशात एका संस्थेने सर्व्हेक्षण केले. विषय होता डिप्रेशन अर्थात मानसिक नैराश्य. १० हजार भारतीयांचा या सर्व्हेमध्ये अभ्यास करण्यात आला. तब्बल ४३ टक्के भारतीय हे नैराश्याने पीडित असल्याचे या सर्व्हेमध्ये समोर आले. ही फारच चिंताजनक बाब आहे. सुदैवाने एक भारतीय तरुणी मानसिक पीडितांना तणावमुक्त करण्यासाठी झटत आहे. निव्वळ भारतीयच नव्हे, तर विविध देशांतील नागरिकदेखील तिच्या तणावमुक्तीची सेवा घेत आहे. ही तरुणी म्हणजे चीनमध्ये स्थायिक असलेली मेक इट हॅपनची संचालिका पूजा कोळंबे.
पूजाचा जन्म चंद्रपूरमधील वसमतकर कुटुंबात झाला. वडील मुकूल वसमतकर बल्हारशाह येथील पेपर मिलमध्ये कार्यकारी अधिकारी, तर आई सविता वसमतकर शिक्षिका आणि एक व्यावसायिकादेखील आहे. सविता वसमतकर यांच्या स्वेटरच्या मशीन्स होत्या. बल्हारशाहच्या शाळेतील सर्व मुलांच्या स्वेटरची ऑर्डर दर वर्षी त्यांच्याकडे असायची. त्या खूप क्रिएटिव्ह होत्या. कलाक्षेत्रात त्यांना खूप आवड होती. बल्हारशाह हा औद्योगिक विभाग होता. त्यामुळे भारतातील विविध गावांतून, शहरांतून नोकरीसाठी आलेले लोक बल्हारशाह कॉलनीत राहत होते. तिकडचं वातावरण हे खूपच विविध संस्कृतीने नटलेलं होतं. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत होते. मंदूताई वसमतकर म्हणजे पूजाची आजी, यांनी बालक मंदिरची स्थापना केली होती. त्यामुळे बुद्धिबळपासून रांगोळी, भरतनाट्यम अशा सगळ्या क्षेत्रांत पूजा गोल्ड मेडलिस्ट झाली. पहिली ते बारावीपर्यंतच पूजाचं शिक्षण बल्हारशाहमधील माऊंट फोर्ट हायर सेंकंडरी शाळेत झाले, तर अकरावी-बारावी शिक्षण बल्हारशाहमध्येच गुरुनानक महाविद्यालयातून केले, तर पुढील शिक्षण नागपूरमध्ये घ्यावे लागले. होमसायन्स शाखा घेऊन, चाइल्ड सायकॉलॉजी विषयात तिने पदवी प्राप्त केली. पहिली नोकरी इन्फोसिस बीपीओमध्ये लागली. कॅम्पस सिलेक्शन झालं. त्यामुळे पुण्याला हिंजेवडीला पूजा आली.
आता पुढं काय? असा प्रश्न पडण्याआधीच संधी समोर येत होत्या. नोकरी सुरू झाल्यावर पदव्युत्तर पदवीसुद्धा मिळवली. कुटुंबीयांची इच्छा होती की, शिक्षण थांबता कामा नये. आई नेहमी सांगायची शिक्षण चालू ठेव. पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठामधून ‘कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रन’ यामध्ये मास्टर्स केलं. मास्टर्स करत असताना नोकरी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी करताना खूप दमछाक होत होती. म्हणून मग पूर्ण वेळ आपल्या शिक्षणाला द्यायचं ठरवलं. एका महिन्यात नोकरी सोडली. या सगळ्यात तिला मदत झाली ती भाऊ भूपेश वसमतकर याची. तो आता डेली हंट या कंपनीचा एचआर डायरेक्टर आहे. “बीपीओ नोकरीत भविष्य नाही. तुझं शिक्षण चालू ठेव”, हे त्याने वेळीच पूजाला सांगितले होते. त्यामुळे पूजासाठी काही निर्णय घेणं सोपं झालं होतं.
मास्टर्स करत असतानाच पुन्हा नवीन संधी मिळाली. सेंटर फॉर रिसोर्सेसमध्ये नवीन नोकरी लागली. या संस्थेने खूप काही दिलं आणि शिकवलं. ज्या क्षेत्रात आपण शिकलोय त्याच क्षेत्राशी निगडीत काम आहे, याचा आनंद होता. या संस्थेत माध्यम समन्वयिका म्हणून नोकरीस लागली. या नोकरीमध्ये रेडिओ प्रोग्राम्स, ऑडिओ क्लिप्स, व्हीडिओ क्लिप्स, पोस्ट प्रोडशन कामं सगळं काही करता आलं, शिकता आलं.
२०१२ मध्ये संदीप कोळंबे या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणाशी लग्न होऊन पूजा पुण्यात स्थायिक झाली. पण नंतर संदीपच्या नोकरीमुळे चेन्नई, बैंगलोर, हैद्राबाद, त्रिवेंद्रम अशा विविध शहरांत जाऊन स्थायिक व्हावे लागले या सगळ्यात आपण नोकरी करतोय-सोडतोय, असे पूजाच्या लक्षात आले. याच दरम्यान संदीपला एका चिनी कंपनीची ऑफर आली. त्यामुळे २०१७ मध्ये कोळंबे दाम्पत्य चीनमध्ये स्थायिक झालं. या सहा-सात महिन्यांतच पूजाच्या वडिलांची बायपास सर्जरी झाली. सगळं वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थित होतं. पण त्यांच्यात सुधारणा होत नव्हती. त्यावेळी वडिलांच्या मित्राची भाची प्रिया अल्टी हिने हीलिंग, स्पिरिच्युअली काही करूयात का? असे विचारले.
तिचा या क्षेत्रात अभ्यास होता. ती सर्टिफाईड फॅसिलिटेटर ऑफ अॅक्सेस कॉन्शसनेस होती. बाबांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्व उपाय करतच आहोत, तर हेसुद्धा करून पाहूयात, असे ठरले. प्रिया नियमित येऊन बाबांचे सेशन्स घेऊ लागली. वडिलांच्या प्रकृतीतदेखील सुधारणा दिसू लागली. हा सगळा अनुभव चांगला होता. हे नक्की काय आहे? याची उत्सुकता पूजाला लागली. आपण सुद्धा ही विद्या शिकायची, असे पूजाला मनोमन वाटले. प्रियाकडून पूजाने ‘अॅक्सेस बार्स’चे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एक दिवसीय प्रशिक्षण बंगळूरुमध्ये घेतले. सुरुवातीस स्वतः अनुभव घेतला. स्वतःला कसं वाटतेय, काय जाणवतंय हे पाहिलं आणि मग प्रशिक्षण घेऊन चीनला परतली.
कोळंबे दाम्पत्य शेंजन सिटीमध्ये राहायला आले. चीनच्या रुढी, परंपरा, तिकडची संस्कृती यांच्यांशी जुळवून घेताना खूप काही शिकता आले. चीनमध्ये स्त्रियांना खूप आदर आहे, हेसुद्धा तिला जाणवू लागलं. आपण जे शिकलो आहोत त्या विषयी शोधाशोध चालू केल्यावर चीनमध्ये एक ग्रुप सापडला. मग त्या ग्रुपमध्ये बार्स एक्स्चेंज करायला सुरुवात केली. ‘अॅक्सेस बार्स’ फॅसिलिटेटर होण्यासाठी तुम्ही तीन व्यक्तींकडून ही विद्या शिकली पाहिजे. अनुभव घेतला पाहिजे, तरच तुम्हाला फॅसिलिटेटर होता येतं. पूजाने भारतीय, चिनी, मेक्सिकन अशा व्यक्तींकडून प्रशिक्षण घेतले होते. २०१८ मध्ये पूजा स्वतः एक फॅसिलिटेटर झाली. या क्षेत्रात खूप काही शिकण्यासारखं आहे. वेळोवेळी ते सगळे कोर्स पूर्ण करत आज ‘मेक इट हॅपन’ नावाची कंपनी सुरू केली. याअंतर्गत सर्वच प्रकारच्या हीलिंगच्या सुविधा ती देते.
प्रत्येक व्यक्ती स्वतः कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रासलेला असतो. अगदी लहान मुलांपासून ते प्रौढ, आजी-आजोबापर्यंत सगळेच. प्रत्येकाला आपले म्हणणं ऐकून आपल्याला समजून घेणारा किंवा फक्त ऐकून घेणारा हवा असतो. नेमकं हेच आपल्या सेवेमध्ये पूजाने देण्यास सुरुवात केली. समुपदेशन करणं, वेबिनार घेणं, मानसिकदृष्ट्या सुदृढ बनविण्याचं काम सुरू केले. यामध्ये ‘बॉडी व्हिस्परिंग’ हा विषयसुद्धा घेतला. आपलं शरीर आपल्याला काय सांगतं? ते कसं ऐकायचं ते शिकवलं जातं. आपलं शरीर हाच आपला सर्वोत्तम मित्र असतो, हे इतरांना पटवून देऊन त्यांचे मानसिकसोबत शारीरिक स्वास्थ कसं जपता येईल? याचा अभ्यास केला.
आपली ओळख ही फक्त कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बायको, आई अशी नको, तर काहीतरी वेगळी पाहिजे. स्वतःची आयडेंटिटी पाहिजे आणि ही ओळख ‘मेक इट हॅपन’च्या स्थापनेमुळे मिळाली. या सगळ्या प्रवासात पूजाचे पती संदीप कोळंबे यांचा भलामोठा पाठिंबा होता. मैत्रीण संध्या खामकरची साथ होती. ज्यांनी विश्वास ठेवून माझ्याबरोबर काम केलं, असे क्लायंट, या सर्वांमुळे आजपर्यंत चार ते पाच हजारांपर्यंत लोकांना मदत करू शकले, असे पूजा सांगते.
आपण आयुष्य खूप मर्यादित ठेवतो. आपली आपण व्याख्या तयार करून ठेवलेली असते. मर्यादेपेक्षा शक्यता असल्या पहिजेत, असं पूजाला वाटतं. एकूणच आजच्या धकाधकीच्या जीवनात, गळेकापू स्पर्धात्मक युगात स्वत:ला मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे. वैश्विक हीलर पूजा कोळंबे ही निव्वळ भारतीयांचीच नव्हे, तर इतर देशांतील नागरिकांचीदेखील गरज भागवते, हे प्रत्येक भारतीयास स्पृहणीय आहे.