प्रा. देवबा पाटील
सुहास व विकास हे दोघेही त्यांच्या शाळेतील अतिशय हुशार व अभ्यासू विद्यार्थी होते. ते दररोज नियमितपणे अभ्यास करीत व सकाळी फिरायलाही जात असत. त्या पावसाळ्याच्या दिवसांत ते दोघेही सकाळी नेहमीसारखे लवकर उठून गुरुजींनी सांगितल्यानुसार सकाळी आपल्या शाळेकडे फिरायला निघाले. ते शाळेत पोहोचत नाही तोच त्यांचे गुरुजीसुद्धा शाळेत आले.
दोघांनीही आदराने गरुजींना नमस्कार केला व गुरुजींसमोर अदबीने उभे राहिले. तेथे ओट्यावर प्रथम गुरुजी खाली बसले व नंतर त्यांच्या समोर ते दोघे बसले.
एवढ्यात त्यांचे लक्ष आकाशात निघालेल्या इंद्रधनुष्याकडे गेले. गुरुजी! आकाशात इंद्रधनुष्य असे एकाएकी कोठून येते? विकासने विचारले. ते कसे काय निर्माण होते गुरुजी? सुहासनेही प्रश्न केला.
गुरुजी म्हणाले, त्रिकोणी लोलक म्हणजे त्रिकोणाकार भिंग किंवा काच, ज्याचा पाया आणि शिर किंवा दोन्ही बाजू एकरूप आणि समांतर बहुभूज असतात, असा काचेचा पारदर्शक घन पदार्थ. तर अशा ह्या पारदर्शक त्रिकोणी लोलकातून जेव्हा सूर्यकिरण आरपार जातात तेव्हा त्याचे सात रंगांत पृथ:करण होऊन विरुद्ध बाजूला सप्तरंगांचा वर्णपट मिळतो; परंतु सातच रंगांचा वर्णपट का मिळतो? सुहासने आपली शंका प्रदर्शित केली.
तो सहा किंवा आठ रंगांचा का नाही आढळत गुरुजी? विकासने सुहासच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
गुरुजी म्हणाले, ही गोष्ट प्रथम सर आयझॅक न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने शोधून काढली. रंगीत वर्णपटाच्या मार्गात दुसरा त्रिकोणी लोलक बरोबर उलटा धरल्यास पुन्हा पांढरा प्रकाश मिळतो. यावरून सूर्यप्रकाश हा सप्तरंगांचाच बनलेला आहे हे सिद्ध होते.
ते सात रंग कोणते आहेत गुरुजी? विकासने विचारले.
गुरुजी म्हणाले, या सात रंगांमध्ये तांबड्या रंगाचा पट्टा सर्वात बाहेर म्हणजे वर असतो, तर जांभळ्या रंगाचा पट्टा आत म्हणजे खाली असतो. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा अशा क्रमाने हे सप्तरंग असतात.
आकाशात त्रिकोणी लोलक तर काही कुठे दिसत नाहीत. सुहासने शंका प्रदर्शित केली. निसर्गात लोलकाचे काम ढगांतील पाण्याचे थेंब करतात. सूर्यप्रकाश पाण्याच्या थेंबातून जातांना त्याचे पृथ:करण म्हणजे विभाजन होते. थेंबातच त्याचे परावर्तन होऊन ढगांच्या पडद्यावर सप्तरंगी वर्णपट दिसतो. गुरुजींनी सांगितले.
परावर्तन म्हणजे काय गुरुजी? दोघांनीही एकदम विचारले.
गुरुजी म्हणाले, कुठल्याही दोन माध्यमांच्या मर्यादेवरील पृष्ठावर एका माध्यमातून प्रकाशकीरण आले म्हणजे ते त्या पृष्ठभागावरून मागे फिरून पुन्हा त्याच माध्यमात परत शिरतात. या क्रियेस परावर्तन असे म्हणतात.
ढगांच्या पडद्यावर जो सप्तरंगी वर्णपट दिसतो त्यालाच आपण इंद्रधनुष्य म्हणतो. अर्थात त्यासाठी सूर्य थेंबांच्या विरुद्ध बाजूला असावा लागतो व निरीक्षकाची म्हणजे बघणाऱ्याची पाठ सूर्याकडे असावी लागते.
सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत सहसा इंद्रधनुष्य दिसत नाही. सूर्यकिरणांनी क्षितिजाशी केलेला कोन जर ४२ अंशपेक्षा जास्त असेल, तर विभाजन झालेल्या सूर्यकिरणांचे थेंबातच परावर्तन न झाल्याने इंद्रधनुष्य दिसत नाही. सूर्यकिरणांनी क्षितिजाशी केलेला कोन हा जितका लहान तितके इंद्रधनुष्य मोठे व सुस्पष्ट दिसते. पण गुरुजी, पुष्कळ वेळा दोन इंद्रधनुष्ये दिसतात. विकास म्हणाला. ढगातील पाण्याच्या थेंबातच प्रकाशाचे दोन किंवा अधिक वेळा परावर्तन व पृथ:करण झाल्यास एकापेक्षा जास्त इंद्रधनुष्ये दिसतात. गुरुजींनी सांगितले.
गुरुजी, दोन इंद्रधनुष्यातील पहिले कोणते व दुसरे कोणते हे कसे काय ओळखायचे? सुहासने प्रश्न केला.
गुरुजी म्हणाले, अगोदर निघालेल्या इंद्रधनुष्याला प्राथमिक इंद्रधनुष्य व नंतर निघणाऱ्याला द्वितीय इंद्रधनुष्य म्हणतात. प्राथमिक इंद्रधनुष्य हे अरुंद असून त्यातील सप्तरंग हे गडद असतात. ह्या सप्तरंगांमध्ये तांबड्या रंगाचा पट्टा वर व जांभळ्या रंगाचा पट्टा खाली असतो.
गुरुजी! या रंगांत तांबडाच रंग वर आणि जांभळाच रंग खाली का असतो? विकासने विचारले.
गुरुजी सांगू लागले, तांबड्या रंगाची तरंगलांबी ही सर्वात जास्त असल्याने त्याचे सर्वात कमी वक्रीभवन होते, तर जांभळ्या रंगाची तरंगलांबी ही सर्वात कमी असल्याने जांभळ्या रंगाचे वक्रीभवन सर्वात जास्त होते म्हणून इंद्रधनुष्यात तांबडा रंग वर व जांभळा रंग खाली असतो; परंतु द्वितीय इंद्रधनुष्यामध्ये या गोष्टी पूर्णपणे उलट असतात. द्वितीय इंद्रधनुष्य हे मोठे परंतु फिक्या रंगाचे असते. त्याचा जांभळा पट्टा वर म्हणजे बाहेर असतो तर तांबडा पट्टा खाली असतो. यामधील रंगसुद्धा प्राथमिक इंद्रधनुष्याच्या उलट क्रमाने असतात. हे प्राथमिक इंद्रधनुष्याच्या वर असते. त्याच्या त्रिज्येचा निरीक्षकाच्या डोळ्यांशी केलेला कोन ५० अंशांचा असतो.
गुरुजी! इंद्रधनुष्य हे अर्धेच का दिसते? सुहासने विचारले.
गुरुजी म्हणाले, इंद्रधनुष्य हे पूर्ण गोलाकार असते पण त्याचा अर्धवर्तुळाकार भाग हा क्षितिजाखाली असतो आणि आपणास फक्त क्षितिजावरचा अर्धगोलाकार भागच दिसतो, म्हणून ते आपणास अर्धवर्तुळाकार दिसते. आता बराच वेळ झाला आहे. आता आपण घराकडे परतू या. असे म्हणत गुरुजी उठून चालू लागले तसे ते दोघेही गुरुजींच्या मागे मागे चालू लागले.