प्रियानी पाटील
वेडी माणसं आपल्या जगातच वावरत असतात. कुठेही राहतात, कसेही… पण आपल्या मर्जीने जगतात. काय असतं हे वेडेपण? कशी होतात ही माणसं वेडी? हा प्रश्न अनेकदा पडला तरी या वेड्या माणसांची भीती कायमच मनात घर करून राहिलेली.
मध्येच हसणं, धावणं, फिरणं, कसंही वावरणं असं काही पाहण्यात आलं तर पुढे जाणारी पावलं आपसुकच मागे वळायची. ही वेडी माणसं आपल्याला कधी भेटू नयेत असं वाटायचं. तरी आजवर ईटा, मंजुळा, रमा या भेटल्याच. ईटाचं नाव विठा पण तिला सारे ईटाच म्हणायचे. तिच्या कळकट्ट रंगात तिचे डोळे काहीसे भुतासारखे भासायचे. केसांचा बुचका बांधून ही दारोदार फिरायची. तशी रस्त्यात मधेच कुठेही उभी राहून स्वत:शीच बोलत असायची. ती बोलत असताना तिचे डोळेही गरागरा फिरायचे. मुलांनी कुणाचं ऐकलं नाही, तर ती ईटा येईल अशी भीती घराघरांत घातली जायची. ईटा रस्त्यात कुठे दिसू नये, भेटू नये असं मनोमन वाटायचं. ही अशी कशी? वेडी कशी झाली, असे प्रश्न अनेकदा पडलेले. पण उत्तर नाही सापडलं. ईटा आपल्याच धुंदीत वावरणारी होती. ती सतत काही पुटपुटत राहायची. कधी मध्येच हसायची. कुणी काही दिलं तर खायची आणि मध्येच रस्त्यात जाऊन उभी राहायची. जेणेकरून रस्त्यातून जाणारी येणारी मुलं घाबरतील. हे तिचं नेहमीचंच झालेलं असायचं. तिच्या मनाची ती होती. ना तिला जगाची भ्रांत होती, ना आपल्याला बघून कुणी घाबरतंय याची फिकीर.
मंजुळाची तर गोष्टच न्यारी. तिचा गळा एवढा मंजूळ की, गाणी गा गा गायची. प्रवासात ही गाडीमध्ये आली की हिची पण भीतीच वाटायची. चुकून आपल्या बाजूला बसली आणि काही केलं तर, या भीतीने मन घाबरून जायचं. पण हिचं गाणं ऐकून कुणी तिला पाच-दहा रुपयेही द्यायचे. तिचा वडापावचा प्रश्न मिटायचा. कधीतरी ती कॅण्टीनला वडापाव खातानाही दिसायची. बसच्या शेडमध्ये बसलेली दिसायची, तर कधी कट्ट्यावर झोपी गेलेली असायची. ना कसली चिंता, ना काळजी. पण यांना बघून दुसऱ्यांना भीती तेवढी वाटायची.
रमा म्हणजे चालतं-फिरतं व्यक्तिमत्त्व. जेव्हा बघावी तेव्हा चालतच सुटलेली दिसायची. आज सकाळी रमा बसमधून एका ठिकाणी चालताना दिसली, तर सायंकाळी ती चार कोस दूर पाेहोचलेली असायची. तिच्या चालण्याचा वेग एवढा प्रचंड असायचा की, ती आपल्याच धुंदीत असायची. रमाचं हे असं रस्त्यावरचं आयुष्य पाहून दु:खही वाटायचं. कशी जगत असतील ही माणसं, कुठे राहत असतील? असे अनेक प्रश्न मनात दाटले तरी यांची एक अनामिक भीती मात्र वाटायची. ही माणसं वेडी झाल्यावर अशी रस्तोरस्ती फिरत असतील, तर घरातील माणसांनी त्यांच्यावर उपचारासाठी काही प्रयत्न करायला हवेत, असे वाटले तरी याचं वेडेपण पाहून ही माणसं उपचारालाही दाद देतील की नाही असा देखील प्रश्नच पडायचा.
एकदा इथल्याच मार्केटमध्ये फिरताना खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. मागे वळून पाहिलं तशी एक बाई हसली. आता ही कोण? प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं तर ती हसतच राहिली. म्हणाली, आज तारीख किती? पण मनाला प्रश्न पडला ही तारीख का विचारतेय? तिची नजर रोखलेलीच. तशी क्षणाचाही विलंब न करता तिला तारीख सांगून टाकली. तसे तिने वेडेपणाचे चाळे करत हाताची बोटं मोडली आणि झपकन दुसऱ्या बाईचा खांदा पकडत तिलाही पुन्हा तोच प्रश्न विचारला? आज तारीख किती? आता कळलं ही वेडी बाई आहे आणि तिने आपला खांदा पकडून विचारलं, तारीख किती? मनात जरा भीती दाटली आणि पावले भरभर त्या बाईपासून दूर पळाली.
रात्रीच्या ट्रेनमध्ये एका स्टेशनला एक तरुण मुलगी आली आणि डब्यामध्येच सैरावैरा धावू लागली. हसत काय होती, गाणं काय म्हणत होती. ही धावते का? म्हणून सगळे तिच्याकडे पाहू लागले. नंतर कुणी म्हटलं, ती वेडी आहे. तेव्हा अरे बापरे, ही आपल्या बाजूला तर येऊन बसणार नाही ना, म्हणून स्टेशन येईपर्यंत देवाचा धावा केला.
तर हल्लीच प्लॅटफॉर्मवर एका बाकावर एक बाई बसली असताना तिच्या बाजूच्या दोन सीट रिकाम्या दिसल्या. वाटलं आपण जाऊन बसावं तिथे, तोवर दोन कॉलेज तरुणी पटकन जाऊन तिच्या बाजूला बसल्या. त्या बाईने इकडे तिकडे पाहिलं. वाटलं ही आता उठेल आणि आपल्याला जागा मिळेल. पण या बाईने त्या दोघींकडे बघत… ‘कल कॉलेज बंद हो जायेगा, तूम अपने घर को जाओगे…’ हे गाणं मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. तिचा हा सूर ऐकून काळजात एकच धडकी भरली. त्या दोघी कॉलेज तरुणीही घाबरून झटकन तिथून उठल्या आणि तोंडावर हात धरून तिथून दूर पळाल्या. तशी ती बाई जोरजोरात हसायला लागली. तिचं ते हसणं बघून आणखीच धडकी. यावर ‘कुठून कुठून कोण कोण भेटतात काय माहिती’ असं जवळपास वाटून गेलं. पण त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार आपणास माहीत नसल्याने त्यांचं हे वेडेपण त्यांच्यासाठी शहाणपणाचं, बिनधास्तपणाचं, तर जगासाठी वेडेपणाचच वाटणारं होतं.