उत्तर प्रदेश : टॅटू गोंदवून घेण्याचे वेड लहानापासुन ते मोठ्यान पर्यंत असलेले दिसुन येते. हेच वेड उत्तर प्रदेशातल्या १४ जणांना महागात पडले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये १४ जणांना टॅटूसाठी वापरण्यात आलेल्या सुईने मृत्यूच्या दाढेत ढकलले आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.
उत्तर प्रदेशामध्ये १४ जणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. त्यानंतर त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. पण त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. त्या १४ जणांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. या चाचणीमधून त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.
या १४ जाणांची विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांनी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला नव्हता. या १४ जणांनी ज्या टॅटू आर्टिस्टकडून टॅटू गोंदवला त्या आर्टिस्टनं पैसे वाचण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता, असे लक्षात आले.