रमेश तांबे
रेणूला आज मावशीकडे जायचे होते. म्हणून ती सकाळी लवकरच उठली. झटपट तयार झाली. आईने मावशीसाठी बनवलेले रव्याचे लाडू सोबत घेतले. आपली सायकल तपासली. सायकलचे ब्रेक्स, चाकातली हवा सारे काही नीट बघितले. प्रवासात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिने डोळ्यांवर गॉगल चढवला. आईचा निरोप घेऊन ती मोठ्या उत्साहाने सायकलवरून निघाली.
रेणूच्या मावशीचे घर तिच्या घरापासून फक्त अर्ध्या तासावरच होते. म्हणून रेणू नेहमी सायकलवरच मावशीकडे जात असे. त्यामुळे हा रस्ता तिच्या चांगलाच ओळखीचा झाला होता. पूर्व दिशेला सूर्य उगवून चांगलाच वर आला होता. तरीही गार वारा वाहत होता. रेणूच्या सायकलने आता वेग घेतला होता. मावशीकडे जाऊन तिला दोन चाकी गाडी चालवायची होती. मावस बहीण शालूबरोबर खूप मजा करायची होती. रेणूच्या मनात नवनवीन विचारांचा नुसता पाऊस पडत होता!
अशा तंद्रीत सायकल चालवणाऱ्या रेणूला कुणीतरी “ताई… ताई…” अशा जोरात हाका मारल्या. ती भानावर आली. सायकल थांबवून मागे पाहाते तर काय, रस्त्याच्या कडेला दोन लहान मुले उभी होती. तीच मुलं रेणूला हाका मारीत होती. रेणूने सायकल बाजूला उभी केली. मुलांजवळ गेली अन् म्हणाली, “काय रे बाळांनो काय हवंय तुम्हाला.” ती मुलं पाच-सहा वर्षांची असावीत. कपडे साधेच पण स्वच्छ होते. मुलं म्हणाली, “ताई, आमची आई आजारी आहे. ती झोपून आहे. कालपासून तिने काहीच खाल्ले नाही. तू आमच्या घरी येशील का?” त्या लहान मुलांचे निरागस बोलणे ऐकून रेणूच्या अंगावर काटा आला. मग रेणू म्हणाली, “चला रे बाळांनो तुमच्या घरी जाऊया.” सायकल घेऊन रेणू मुलांच्या मागोमाग निघाली. रस्त्यापासून पाचच मिनिटांवर एक झोपडपट्टी होती. दोन-चार गल्ल्या पार करीत रेणू मुलांच्या घरी पोहोचली. घर साधंच होतं. पण नीटनेटकं होतं. मुलं धावतच घरात शिरली अन् मोठ्याने ओरडून सांगू लागली. “आई आई बघ कोण आलंय आपल्याकडे. ताई आलीय ताई…!” आवाज ऐकून आईने हळूच डोळे उघडले. ती खाटेवर पडून होती. चेहरा पार सुकला होता. डोळे खोल गेले होते. ती पार खंगलेली दिसत होती. रेणू मुलांच्या आईजवळ गेली. काय होतंय याची विचारपूस केली. आई म्हणाली, “चार दिवस ताप आहे अंगात. औषध नाही, खाणं नाही.” आई उपाशी अन् ती छोटी मुलंदेखील उपाशीच होती. त्यांची परिस्थिती पाहून रेणूला खूपच वाईट वाटले.
रेणूने आपल्याजवळचा लाडवांचा डबा मुलांच्या हाती दिला. त्यातला पहिला लाडू त्यांनी आईला भरवला अन् तिच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली, “आई घाबरू नकोस आता आपली ताई आली आहे.” रेणूला कळेना या मुलांना आपल्याबद्दल एवढा विश्वास कसा वाटतो. आता आपण मुलांच्या आईसाठी काहीतरी करायलाच हवे असं तिला वाटू लागले. ती घराबाहेर आली अन् तिने बाबांना फोन केला. पाच मिनिटे ती बाबांबरोबर काहीतरी बोलत होती. तेव्हा ती दोन्ही लहान मुलं रेणूकडे अगदी टक लावून पाहत होती. बोलणं संपवून रेणू घरात आली अन् मुलांना म्हणाली, “बाळांनो आई चांगली होईल. आपण तिला डॉक्टरकडे नेऊ या!”
पंधरा मिनिटांतच बाबा ॲम्ब्युलन्स घेऊन आले. सोबत रेणूची आईदेखील आली होती. मुलांना शेजाऱ्यांकडे ठेवून चार दिवसांकरिता त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली. मग मुलांच्या आईला एका छोटेखानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखल केले. सर्व कामे पूर्ण झाल्यावर रेणूला बरे वाटले. तिच्या चेहऱ्यावर एक आगळेच समाधान झळकत होते. रेणूची आई दूरवरून आपल्या लाडक्या रेणूकडे मोठ्या कौतुकाने बघत होती. अवघ्या दोनच दिवसांत मुलांची आई ठणठणीत बरी झाली. तिसऱ्या दिवशी त्यांना घरी नेल्यावर रेणू समाधानाने घरी परतली.
नंतरचे दहा दिवस भरभर निघून गेले अन् एके दिवशी आई तिच्या दोन्ही लहान मुलांसह रेणूच्या घरी हजर झाली. “रेणूताई तुमच्यामुळेच माझा जीव वाचला. नाही तर माझ्या मुलांचे काय झाले असते!” असं म्हणत मुलांची आई पदराने डोळे पुसू लागली. “झालेला सर्व खर्च हळूहळू मी देईन परत” असं मुलांची आई म्हणताच रेणू त्यांचा हात हातात घेत म्हणाली, “पैसे वगैरे काही नकोत बरे अन् आभारही मानायला नकोत. ही छोटी मुलं मला ताई म्हणतात. अगं तू तर माझी मावशीच झालीस ना! मग भाचीचे कुणी आभार मानतात का!” तेवढ्यात ती दोन्ही लहान मुलं ताई ताई करीत रेणूला बिलगली. त्यावेळी तिथं उभ्या असलेल्या रेणूच्या आई-बाबांचेदेखील डोळे भरून आले होते!