मुंबई (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार या युवकावर झालेल्या हल्ल्याची चौकशी ‘एनआयए’कडे सोपविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ४ ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार या युवकावर समाज माध्यमांतून नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे मुस्लीम युवकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीही राणे यांनी
यावेळी केली.
नितेश राणे म्हणाले, शिवलिंगावर जर घाणेरडे प्रकार होणार असतील, आमच्या लोकांना मारण्यापर्यंत जर तुमची हिंमत होत असेल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी ‘तिसरा डोळा’ उघडावा लागेल. शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणे यांनी हा इशारा दिला. देशात शरिया कायदा लागू झालेला नाही. आमच्या लोकांवर असेच हल्ले होत राहिले, तर आम्ही शांत बसणार नाही, जशास तसे उत्तर देऊ, असेही ते यावेळी म्हणाले. मात्र दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपांविषयीच्या प्रश्नांकडे आमदार नितेश राणे यांनी दुर्लक्ष केले.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. या आक्षेपार्ह विधानानंतर नूपुर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून उदयपूर या ठिकाणी कन्हैय्यालाल नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. असाच प्रकार महाराष्ट्रातील अमरावती येथेदेखील घडल्याचाही आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून केला जात आहे. या घटनेनंतर, ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी प्रतीक पवार नावाच्या तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.
नितेश राणे म्हणाले, काही आठवड्यांपूर्वी नाशिकमधील एका युवकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्याने शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या घटनेनंतर आपण नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो होतो. आमच्या असंख्य देवी-देवतांच्या फोटोंची आणि मूर्तींची विटंबना केली जाते. पण आम्ही लोकशाही पद्धतीने आवाज उठवतो. तुम्ही तुमच्या देवतांचा झालेला अवमान विसरायला तयार नसाल, तर आम्ही विसरण्याची भूमिका का घ्यावी? असेही राणे यावेळी म्हणाले.
नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याने अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली, भाजप नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, अहमदनगरच्या कर्जतमध्येही एका तरुणाला धमकावून टोळक्याने कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जीवनमृत्यूशी झुंज देत आहे. त्याची भेट घेऊन त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.