मृणालिनी कुलकर्णी
आज राष्ट्रीय मैत्री दिन! मैत्रीदिनाच्या शुभेच्छा! दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी राष्ट्रीय मैत्रीदिन साजरा केला जातो. जीवनात मैत्रीच्या उपस्थितीची कदर करण्याचा दिवस तो मैत्रीदिन!
मित्र आणि मैत्रीचा सन्मान करण्याची उदात्त कल्पना प्रथम २० जुलै १९५८ रोजी पॅराग्वेच्या उत्तरेला पॅराग्वेच्या नदीवर मित्रांसोबत जेवताना मांडली गेली. जागतिक मैत्रीचा पाया, ‘जो वंश, रंग, धर्माचाही विचार न करता सर्व मानवामध्ये मैत्री आणि सहवास वाढवितो’ यावर आधारलेला आहे. त्यानंतर इतर देशातही मैत्रीदिन पसरला. १९३० च्या दशकात हॉलमार्क ग्रीटिंग्स कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी एकमेकांना ग्रीटिंग्स पाठवून मैत्री साजरी करावी असे सुचविले; परंतु हा व्यावसायिक विचार संपुष्टात आला. मानवाने चंद्रावर प्रथम पाऊल टाकल्यानंतर एकसंध भाव म्हणूनही आंतरराष्ट्रीय मैत्रीचे स्मरण करण्याचा प्रयत्न झाला होता. अशी अनेक आयाम असलेली ही मैत्री मुक्त आणि व्यापक आहे. जसे –
१) वेष, भाषा, संस्कृती या साऱ्या घटकांमधील अंतर मैत्री भरून काढते.
२) रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नातेबंध मजबूत आणि निखळ असतात.
३) चांगले मित्र शोधणे, त्याहून कठीण
मैत्री टिकविणे आणि मैत्री विसरणे तर केवळ अशक्यच. असा हा अडथळ्या पलीकडील मैत्रीचा सहवास.
बालपणीचा काळ सुखाचा! शालेय जीवनातील मैत्री निर्वाज्य असते. आंतरराष्ट्रीय मैत्रीदिनानिमित्ताने मुलांमध्ये मैत्रीच्या नात्याचे समर्थन करण्यासाठी काही शाळेत एक आठवडा मैत्री उत्सव साजरा करतात. शाळेत भिन्न कुटुंबातून आलेली, भिन्न स्वभावाची मुले असतात. उपक्रम राबविताना शाळेने ही विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे. मैत्री नात्याच्या समर्थनासाठी इसापनीती, बालवाङ्मय अशा पुस्तकांचे वर्गात वाचन करतानाच एकमेकांना मदत करण्याच्या महत्त्वावरही चर्चा व्हावी. नवीन मित्र जोडण्यासाठी सांघिक खेळाचे आयोजन करावे. मैत्रीदिनाला हात बँडनी, फोन संदेशानी भरून जातो. बँड, फुले, गिफ्टपेक्षा मुलांमध्ये मैत्रीचा संस्कार जागवावा. थोडक्यात शाळेतच मैत्रीशक्ती अधोरेखित करावी.
मोठेपणी मित्र-मित्र एकत्र येऊन पार्टीला, औटिंगला जातात. त्यातच तेथे कोणी एकटे असेल, तर त्याला सामावून घ्या. एकटेपणाची आठवण कुणालाही होऊ देऊ नका. तो खरा मैत्रीदिन. वाचलेले मैत्रीचे आयाम शेअर करते. –
१) दोन मित्र रस्त्यातून चालले असताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्याच्या श्रीमुखात भडकावली. तो गप्प बसला. थोड्या अंतरावर थांबून त्यांनी वाळूवर लिहिले ‘माझ्या जीवाभावाच्या मित्रांनी अकारण माझ्यावर हात उगारला.’ न बोलता काही अंतर दोघे पुढे चालताना, मार खाल्लेल्या मित्राचा पाय नदीत घसरून तो चांगलाच पडला. त्याच मित्रांनी त्याला वाचविले. आणखीन थोडे पुढे जाताच एका काळ्या कुळकुळीत दगडावर त्यांनी लिहिले, ‘आज माझ्या मित्रांनी माझा जीव वाचविला.’ न राहून दुसरा मित्र म्हणाला, तू हे का लिहितोस? तो म्हणाला, यालाच मैत्री म्हणतात. काळाची लाट येताच हलक्या हातानी वाळूवर लििहलेली अक्षरे पुसून गेली. मित्राविषयी माझ्या मनात अढी नाही. दगडावर कोरलेली अक्षरे पुसली जाणार नाहीत. ‘मारलेल्यापेक्षा तू मला वाचविलेस हे माझ्या लक्षात राहील’.
२) आत्मभान जागे करणारा विद्यार्थी मैत्रीचा सुखद अनुभव. – शाळेच्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी वैयक्तिक साहसासाठी एका वस्तूच्या आधारे दोन झाडांमधील बांधलेल्या तारेवरून चालणे हा खेळ होता. सुरक्षिततेसाठी प्रशिक्षक होते. काही जणांनंतर सुझी तयार आहे, असा आवाज आला. ती तयार होती तरी तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. सुझी थोडी झाडावर चढताच एका खाचेपाशी धडपडली. साऱ्यांनी तिचा आत्मविश्वास वाढविला. “मी वर जाऊ शकणार नाही, असे बोलून सुझीने झाडाला घट्ट मिठी मारली.’ शांतता मोडीत मेरी म्हणाली, “सुझी भिऊ नकोस, काही झाले तरी मी तुझी मैत्रीण राहीन”. पाहतो तर सुझी भराभरा चढून तारेवरून यशस्वीपणे चालून खाली उतरताच मेरीने सर्वप्रथम धावत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
३) मैत्रीचे महत्त्व जाणता आले पाहिजे, मैत्रीत व्यवहार नको. ज्येेष्ठ लेखिका शांता शेळकेंच्या पुस्तकात शन्नांनी वाचलेली या आशयावरची ही गोष्ट – दानी नावाच्या जगप्रसिद्ध चित्रकाराने त्याच्या जीवलग मैत्रिणीला मरणापूर्वी एक दगड भेट दिला. तिला अजब वाटले. तिने तो दगड घरच्या कुंडीत टाकला. दानीच्या मरणोत्तर वस्तुसंग्रहालयासाठी एक्स्पर्ट लोकांनी त्या मैत्रिणीकडे दिलेल्या दगडाची चौकशी करता तिने कुंडीतील तो दगड त्यांना दिला. त्या दगडाचे महत्त्व तिला सांगताना एक्स्पर्ट म्हणाले, दानीचा मित्र नील आर्मस्ट्राँगनी चंद्रावरून आणलेला तो दगड आहे. त्या दगडाची अब्जावधी डॉलर किंमत असूनही कोणतीही रक्कम न घेता तो दगड दानीच्या मैत्रिणीने त्या वस्तुसंग्रहालयाला दिला.
४) लेखक, वक्ते डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर लििहतात – माझे जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध झाले, ते माझ्या मित्रांमुळे. मित्र मला आपोआप मिळाले. माझी पुस्तके वाचून माझा पत्ता शोधत दुर्गा भागवतांनी मला पहिले पत्र लिहिले. आमचा पत्राचा सिलसिला नंतर एकेरी नावात आला. तो पत्रव्यवहार अंजली कीर्तनेच्या पुस्तकात आहे. ‘बखर राजधानीची’ या माझ्या पुस्तकाने विजय तेंडुलकर इतके हेलावून गेले. ते म्हणाले, ‘या पुस्तकाच्या प्रति मी विकत घेऊन वाटणार.’ त्यांनीही माझा पत्ता शोधत सुरू झालेला आमचा पत्रव्यवहार निखिल वागळेंच्या पुस्तकात आहे.
कवितेमुळे विंदाशीही मैत्री झाली. डॉ. दत्तप्रसादांचा भविष्यावर, देव संकल्पनेवरही विश्वास नव्हता; तरीही कालनिर्णयामुळे, साळगावकरांकडे अनंत चतुर्थीला पूजेनंतरच्या पंगतीत पहिले पान ज्योतिरावांचे नि दुसरे माझे, नंतर त्यांची तीन मुले बसत. मधू लिमये, नानाजी देशमुख आणि बलराज मधोक तिघेही परसस्पर विरोधी विचारांचे तरीही तिघांचे गोपनीय व्यवहार पोहोचविण्याचे काम मी (दत्तप्रसाद) करीत होतो.
“जी मैत्री एकमेकांच्या विचारांचा आदर करते तीच टिकते.” असे हे मैत्रीची शिकवण देणारे आयाम!