Thursday, September 18, 2025

बेबी

बेबी
डॉ. विजया वाड बेबीचा चौदावा वाढदिवस. थाट-माट केला होता संजूने. बेबीसाठी नवे कपडे. नवे लाळेरे! नवनवीन बूट-मोजे. सारा नव्वा थाट. बेबीच्या तोंडातून लाळ गळे; नि तोंड वाकडे होई. तिचा सुंदर चेहरा वाकडा होई. पण संजू तो प्रेमाने सरळ करी. मी बेबीसाठी जायची. बेबीला आनंद व्हायचा. मी गेले की, ती टाळ्या वाजवायची. बोलण्याचा प्रयत्न करायची. मावछी मावछी म्हणायची. मला आनंद वाटायचा. संजूसाठी, तिच्या नवऱ्यासाठी. आई-बाप जीवतोड मेहनत करीत. संजूचा नवरा रिक्षाचालक होता. पण दुसरे मूल होऊ दिले नव्हते. एकटी बेबी! मी एकदा विचारले, “बेबीला बहीण-भाऊ नको का?” “बेबी एकटी पुरेशीय आम्हा दोघांना.” इतक्यात ‘आई’ अशी बेबीची आर्त हाक. संजू धावली. बघते तो काय? बेबीचा फ्रॉक लाल डागांनी माखलेला. “अरे, बेबी ‘मोठी’ झाली? अहो, आपली बेबी ‘मोठी’ झाली.” संजू कौतुकाने म्हणाली. “डॉक्टरांकडे जायचे नं?” “जायचे जायचे. जावेच लागेल.” संजूच्या स्वरात निश्चय होता. अशा मतिमंद मुलीवर डॉक्टर सांगतील तो उपाय करणे याशिवाय उपाय नव्हता. “डॉक्टर, बेबी ‘मोठी’ झाली.” मी संजूसोबत होते. “अरे वा! जबाबदारी वाढली.” “कमलाकर सांभाळतो तिला.” “ताबडतोब स्त्री सेवक नेमा. संजूताई, धिस इज अ मस्ट.” “डॉक्टर, कमलाकरला काय सांगू?” “कधीपासून आहे तो?” “चौदा वर्षे झाली. अतिशय प्रामाणिक सेवक आहे.” डॉक्टरांना वाईट वाटले. चौदा वर्षांची सेवा? ‘एकदम बंद करा’ असे कसे सांगावे? “हे पाहा, संजूताई, व्यवहार म्हणून सांगतो.” “बोला ना डॉक्टर. मोकळेपणाने सांगा.” “मतिमंदत्व हा शाप आहे.” “मला ठाऊक आहे ते. कुठल्याही औषधाने बरा होणारा हा रोग नाही. मतिमंदत्व आयुष्यभर जपायचे.” “आपण आहोत तोवर ठीकच! पण संजूताई आपण अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्मलो नाही ना! आपणासही जन्म-मृत्यू आहेच. मला, तुम्हाला, बेबीला, संजू, तुमच्या नवऱ्यालासुद्धा हे सर्व लागू आहे.” “डॉक्टर” संजूचे नेत्र सजल झाले. ती डोळे पुसून म्हणाली, “आपण आहोत तोवर ठीक आहे.” “मग काय?” डॉक्टरांना तिच्याकडून उत्तर हवे होते. “मनावर दगड ठेवून सांगते.” “डॉक्टर बेबीचे ऑपरेशन करून टाका. मूल होऊ नये म्हणून.” “काय? बेबीची आई!” “होय.” संजूने डोळे पुसले. आवाजावर ताबा मिळवला. तिला दुसरे मूल नव्हते. नको होते का? पण असेच झाले तर? भीती मनभर दाटलेली. मतिमंदत्व हा शाप आहे तो भोगतो आहोत आपण. हसरे, आनंदी बालक सर्वांनाच हवे असते. पण मतिमंद बालक? ना बाबा ना! पेन्शन सरकारी मिळेल? तरी पण नो मीन्स नो! “हे पाहा डॉक्टर, बेबीचे लग्न होणे शक्य नाही.” “मला समजू शकते ते!” “पण तिला शरीर आहे. ते अनावर होऊ शकते.” संजूने फार पुढचा विचार केला होता. “बेबीची आई...” डॉक्टरही गदगदले. “मी सोय केली आहे.” “काय?” “होय. कमलाकरशी बोलले आहे.” बेबीची आई बोलत होती. तिचा स्वर सच्चा होता, आवाजात धार होती. “डॉक्टर, मी कमलाकरला सांगितलंय की, बेबीचं ‘समाधान’ करीत जा म्हणून.” “आणि? …” “आणि तो ‘हो’ म्हणाला. बेबीला सारी सुखे मिळावीत. एवढीच इच्छा!” बेबीची आई म्हणाली. मी बघतच राहिले.
Comments
Add Comment