उरण (वार्ताहर) : सध्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पहायला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. त्यातच शहरामध्ये दुचाकी, चारचाकी खासगी गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खासगी गाड्यांचे वाढलेले प्रमाण रस्त्यावर पडलेले खड्डे आदी कारणांमुळे उरणवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाहन बाळगण्याच्या खोट्या प्रतिष्ठेविषयी जनसामान्यांच्या मानसिकतेत जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये तोडगा निघणे अवघड आहे. पाश्चात्य देशांचे आपण अनुकरण करतो, त्या देशांमध्ये सायकल चालविणे प्रतिष्ठेची बाब मानली जात आहे. सायकल चालविल्याने शरीराचा व्यायाम होतो, इंधनाची हानी तसेच पर्यावरणाचे नुकसान होत नाही आणि आपल्या देशात मात्र सायकल चालविणे कमीपणाचे लक्षण मानले जात आहे. रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या एकीकडे वाहतूक कोंडीला निमंत्रण देत असताना, दुसरीकडे मनमानी पार्किंगदेखील वाहतूक कोंडीला हातभार लावत आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पार्किंगला जागा आता कमी पडू लागली आहे. सोसायटीतील सदनिकांची संख्या व तळमजल्यावर असलेली पार्किंगची जागा हे समीकरण पूर्वी योग्य होते. मोजक्या दुचाकी व नावाला २-४ चारचाकी यामुळे सोसायटी आवारात वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध होत असे; परंतु आता एकाच सदनिकेमध्ये दोन दुचाकी व एक चारचाकी आल्यावर सोसायटी आवारात पार्किंगची समस्या निर्माण होणारच. त्यामुळे सोसायटी आवारात जागा कमी पडू लागल्यावर सोसायटीजवळील रस्त्यावर ही वाहने उभी केली जाऊ लागल्याने रस्त्यावरील रहदारीला त्यामुळे अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रस्त्यांकडून होणारी निकृष्ट दर्जाची डागडुजी रस्त्यावरील खड्ड्यांना निमंत्रण देत आहे. मुसळधार पडणारा पाऊस व अवजड, मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावरील वर्दळही रस्त्यांच्या दुरवस्थेला निमंत्रण देत असते.
उरण तालुक्यात व शहरात वाढती अतिक्रमणे व वेडीवाकडी वाहने उभी करणे तसेच नवीन इमारत उभ्या रहात असतानाही त्यांना पार्किंगचीही सोय नाही. याबाबत तक्रार करूनही प्रशासन आर्थिक साटेलोटामुळे त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. प्रतिष्ठेविषयीच्या भ्रामक संकल्पनेपायी वाहन खरेदीची जी चढाओढ निर्माण झालेली आहे, त्यालाही आळा बसणे आवश्यक आहे. वाहनाची खरोखरीच गरज आहे का? वाहन खरेदी केल्यावर पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे का? यावरही कौटुंबिक विचारविनिमय होणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास लोकोपयोगी उपक्रमाला चालना मिळते व आपलाही इंधनाचा खर्च वाचतो. जिथे शक्य आहे तिथेच वाहनांचा वापर होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात केल्यास या समस्येचे लवकरात लवकर निवारण होईल.