Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीभंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती गंभीर

भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती गंभीर

भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती गंभीर असून सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडितेवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना घटनास्थळी नेऊन पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरु आहे.

भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेची अवस्था गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे. ३० जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान ३५ वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केले होते. त्यानंतर ती गावकऱ्यांना गंभीर निर्वस्त्र अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती.

सुरुवातीला पीडितेला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथेही तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्यामुळे सुरुवातीला डॉक्टरांनी ते थांबवण्याचे प्रयत्न केले. नंतर आवश्यक असलेली कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे.

भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत. यात संपूर्ण गुन्हांत ३ आरोपींचा समावेश असून २ आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.

या गुन्हाची सुरुवात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्याने भंडारा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांना २ संशयित आरोपींसह गुन्हाचा तपास वर्ग केला आहे. सध्या दोन्ही आरोपींना गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून फरार आरोपींचा शोध गोंदिया पोलीस घेत आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ पीडितेच्या भेटीला

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची भेट घेऊन रुग्णालय प्रशासनासोबत तिच्या प्रकृती संदर्भात बोलण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचल्या. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनासोबत संवाद साधून पीडितेच्या आरोग्याबाबत विचारपूस केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, ३० जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्यायाठी निघाली होती. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. पण या नराधमाने पुढे तिला घरी सोडले नाही, तर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन ३० जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्याने दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, ३१ जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीने पळ काढला.

पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या गॅरेजमधील (आरोपी २) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतरही घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीने आपल्या एका मित्राला सोबत घेत १ ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.

पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहिलं. विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती. काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सकाळी ८ वाजता पीडितेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -