Thursday, September 18, 2025

ठाकरे कुटुंबीयांविरोधात बोलणाऱ्या आमदारांचे शिंदेंनी टोचले कान

ठाकरे कुटुंबीयांविरोधात बोलणाऱ्या आमदारांचे शिंदेंनी टोचले कान

मुंबई : बंडखोरीनंतर ठाकरे कुटुंबीयांबाबत आक्रमक न होण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊनही काही आमदार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तुटून पडत असल्याची बाब शिंदे यांनी गांभीर्याने घेतली आहे. ‘नको त्या विषयात नको तेवढे बोलू नका,’ असे बजावत आपल्या गटातील आमदारांचे कान शिंदे यांनी टोचल्याचे सूत्रांकडून समजते.

शिवसेनेत बंड पुकारल्यापासून शिवसेनेतील नेते आणि बंडखोरांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातून या दोन्ही गटांतील वाद टोकाला गेल्याचे दिसत आहे. परंतु बंडानंतरच्या पहिल्या काही दिवसांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर काहीही न बोलण्याची भूमिका शिंदे यांनी घेतली होती. ठाकरे यांच्याबाबत वैयक्तिक टीका केली जाणार नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही जाहीर केले होते. तरीही, आदित्य हे राज्यात फिरत असताना बंडखोरांवर हल्लाबोल करीत आहेत. त्यातही, ‘गद्दारांनो, राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा,’ असे आवाहन आदित्य करीत आहेत.

त्यावरून आदित्य आणि काही बंडखोर आमदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. त्यातून ठराविक आमदार तर आदित्य यांना ‘टार्गेट’ करीत आहेत. त्याआधी शिंदे यांना सुरक्षा पुरविण्यावरूनही काही आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आपले मोजके आमदार हे रोज वादग्रस्त बोलत असल्याच्या तक्रारी काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर शिंदे यांनी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या आमदारांचे कान टोचल्याचे समजते. शिंदे यांच्या शब्दापलीकडे नसलेले हे आमदारही आता ‘बॅकफूट’वर येण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment