अरुण बेतकेकर
”वरून बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा सर्व काही पाहतोय. तो तुम्हाला माफ करणार नाही. या मातीत तुम्ही खतम व्हाल. आज तुम्ही घोड्यावर बसले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, Mark My Words” हा संजय राऊत यांना झालेला नवा साक्षात्कार. असे साक्षात्कार त्यांना वारंवार होत असतात. सतत बोलून अवलक्षण ओढवून घेणारे संजय राऊत यांचा दांडगा आत्मविश्वास विलक्षण आहे. असे नव नवे प्रयोग करताना आधीच्या वक्तव्याने माजलेल्या काहुरांचे स्वतःस विस्मरण झाल्याचे भासवत लाज, लज्जा सोडून नवे बेताल वक्तव्य ते करत असतात. काही उदाहरणे…
- अलीकडे फेब्रुवारी २०२२ दरम्यान संपन्न झालेल्या गोवा विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान राऊत म्हणाले होते, “शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होणार नाही, यावर आम्हाला विश्वास आहे. Mark My Words.” प्रत्यक्षात काय घडले, तर शिवसेनेने लढलेल्या ११च्या ११ उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. चार उमेदवारांना शंभरहून कमी मते मिळाली. शिवसेनेला ०.१८% मते मिळाली, तर NOTA ला १.१२%. देवेंद्र फडणवीस त्यावेळी म्हणाले होते, “शिवसेनेची लढत भाजपशी नाही, तर NOTA सोबत आहे” अन् घडलेही तंतोतंत तसेच.
- याच दरम्यान फेब्रु. – मार्च २०२२, उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारात सोबत आदित्य ठाकरे यांना घेत झालेल्या जाहीर सभेत राऊत म्हणाले होते, “उत्तर प्रदेशमधून भाजपची सत्ता उखडली जाणार, शिवसेनेस चांगली मते मिळतील, आम्ही सत्तेत सहभागी होऊ आणि राजू श्रीवास्तव आपण शिवसेनेचे पहिले मंत्री व्हाल. Mark My Words…” प्रत्यक्षात घडले असे, शिवसेनेने लढलेल्या सर्व ४५ उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. शिवसेनेस केवळ ०.०३% मते मिळाली, तर NOTA ला ०.६९%. येथेही लढत NOTA सोबतच अन् त्यातही हार.
- “महाविकास आघाडी अभेद्य आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी तीस सत्तेतून खाली खेचणे अशक्य. केवळ ५ वर्षे नव्हे, तर पुढील २५ वर्षे ती महाराष्ट्रावर सत्ता गाजवेल.” Mark My Words… प्रत्यक्षात हे शब्द हवेत विरळण्यापूर्वीच आघाडी कोसळली ती कायमची.
- “शिवसेनेस आता राष्ट्रीय स्तरावर दिल्ली जिंकायची आहे आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान पदावर आरूढ झालेले असतील.” Mark My Words… प्रत्यक्षात ते कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचेही जाणवले नाही. त्याना स्वतःचे ५५ आमदारही राखता आले नाही आणि त्यातील ४० आमदारांनी उद्धवजींपासून दुरावा केला, तसेच १८ खासदारापैकी १२ जणांनी उद्धवजींना राम राम ठोकला. हे घडले केवळ निष्क्रियता आणि अकार्यक्षमतेमुळे.
- कोरोना दरम्यान राऊत म्हणाले होते, “जागतिक आरोग्य संस्था (WHO) यांना सुद्धा मार्गदर्शन करू शकतील, इतके वैद्यकीय ज्ञान उद्धवजींकडे आहे, हे ज्ञान आपणास येते कोठून?” Mark My Words… प्रत्यक्षात या दरम्यान ते स्वतः आजारी होते, महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस देशामध्ये सर्वाधिक होत्या. मृत्यूंच्या संख्येत महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर राहिला. कोरोनाच्या उपचारात भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळला. असे एक नव्हे, तर अक्षरशः शेकडो उदाहरणे देता येतील. जेणेकरून, ते जे बोलले नेमके त्याच्या विरुद्धच घडले. एकहाती होत्याचे नव्हते करण्याची क्षमता राखून असलेले संजय राऊत कधीच उद्धवजींना कळले नसतील का? ते अक्षम्य आहेत का? मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांनी शिवसेनेचा त्याग करताना दोषारोप राऊतांवरच केला. शिवसेनेचा पराकोटीचा घात करूनही ते उद्धवजींचे निकटवर्तीय कसे? त्यांना रोखण्याचे धारिष्ट्य शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यात कधीच नव्हते का? हा प्रश्न सर्वांसाठी अनाकलनीय आहे.
यामागील रहस्य असे, १९९२ साली संजय राऊत सामना दैनिकात पगारी कर्मचारी म्हणून रुजू झाले. १९९८ साली स्वतःस दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यसभेवर खासदारकी देण्याचे मान्य केले होते, असे त्यांचे म्हणणे. प्रत्यक्षात ते दिले गेले प्रितीश नंदी यांना. मनासारखे न घडल्याने राऊत प्रक्षुब्ध झाले. शिवसेना, बाळासाहेब व ठाकरे कुटुंब यांच्याविरोधात त्यांनी सामन्यातूनच आगपाखड सुरू केली होती. नेमक्या त्याच समयी मी लोकाधिकार समितीच्या कामानिमित्त सामना कार्यालयावर पोहोचलो. मला राऊत म्हणाले, “सामना वाचलात का? ठाकऱ्यांची कशी उतरवली आहे. आपणासही ठाऊक आहे. मला खासदारकी बहाल केली होती. पैशाचा व्यवहार करून ती प्रितीश नंदीना दिली. मराठी माणसाचा घात केला. आता पुढे पाहा या बाप-लेकाचे (बाळासाहेब आणि उद्धव) कपडे उतरवून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. काय करतील सामन्यातून काढून टाकतील. पण अन्य ठिकाणी जाऊन मी हेच जारी राखेन. इतकी वर्षे सामन्यात बसून उखडलेली नाहीत. ठाकरे कुटुंबाचे शेकडो छक्के-पंजे पुराव्यासह माझ्याकडे आहेत.”
राऊतांचे हे शब्द ऐकताच मीही संतापलो होतो. तेथेच त्याला ठोकणार होतो. पण बाळासाहेबांनीच त्यास दिलेल्या खुर्चीचा मान राखत संयम राखला. लागलीच संपूर्ण घटना व माझ्या भावना मातोश्रीवर प्रत्यक्ष भेटून शब्दश: बाळासाहेब व उद्धवजींच्या कानावर घातल्या. अपेक्षित होते त्यावर कारवाई होईल. पण आश्चर्य म्हणजे, राऊतांविरुद्ध सक्त कारवाई करण्याऐवजी त्यांनी मला सबुरीचा सल्ला दिला आणि त्यांना बोलावून आम्ही तडजोडीने हा प्रश्न सोडवू, असे म्हणाले. हे ऐकताच बाळासाहेबांसारख्या कोणाचीही तमा न बाळगणाऱ्या आक्रमक व्यक्तीसही हतबल झालेला मी पहिला. जर ही स्थिती बाळासाहेबांची, तर उद्धवजींकडे यास तोंड देण्याची क्षमता असेल का? ठाकरे कुटुंबाविषयीचे असे कोणते छक्के-पंजे राऊत यांच्या हाती आहेत, हे ठाकरे आणि राऊतच जाणे. पण हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे हे निश्चित. मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक गेले, शिवसेना संपतेय तरी बेहत्तर. पण संजय राऊत टिकले पाहिजेत. उद्धवजींच्या या एका वागण्याने अधोरेखित होते की, ठाकरेंच्यासाठी राऊत ही भिंतीतली सहन न होणारी एक खुंटी आहे.