नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोविड-१९ रुग्णवाढीवर केंद्र सरकारने धोक्याची इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणाच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून या सात राज्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे.
भूषण म्हणाले, “कोरोना प्रतिबंधक लसीसाठी पात्र असलेल्या लोकांच्या लसीकरणाची गती वाढवणे आणि कोरोना रोखण्यासाठीचे पाच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एक पत्रक जारी करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की आगामी काळात विविध उत्सवांसाठी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे रुग्ण वाढ होऊन मृत्यूमध्ये वाढ होऊ शकते. रुग्णसंख्या जास्त येत असलेल्या जिल्ह्यांवर नजर ठेवत उपाययोजना करा, पॉझिटिव्हिटी रेट आणि संसर्ग न वाढू देण्यासाठी प्रयत्न करा आणि केस मॅनेजमेंट करण्याचे आवाहन देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी केले आहे.
देशात २४ तासांत भारतात १९,४०६ नवीन कोरोना रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात १९,४०६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून ४९ मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण संक्रमणांपैकी ०.३१ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५० टक्के आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी पाच जणांचा मृत्यू
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या 11906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.