डहाणू (वार्ताहर) : पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा डाव डहाणू येथील स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला. डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे आदिवासी महिलेला पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यात धर्मांतरणाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील गरीब अशिक्षित आदिवासींना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत, पैशांचे आमिषे दाखवत धर्मांतरण केले जाते. यामुळे गावोगावी मूळ हिंदू आदिवासी आणि धर्मांतरण केलेले ख्रिश्चन आदिवासी यांच्यात सण-उत्सव आणि इतर प्रथा साजऱ्या करण्यावरून वारंवार वाद निर्माण होण्याचे प्रकार घडत आहेत.
शुक्रवारी डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे चार ख्रिश्चन मिशनरींनी एका आदिवासी महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिला धर्मांतरण करण्यासाठी सक्ती केली. सदर प्रकार गावातील नागिरकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून या मिशनरींना धारेवर धरुन जाब विचारला. याप्रकरणी सदर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर डहाणू पोलिसांनी क्लेमेंट डी. बैला, मरीयामा टी. फिलीप्स, परमजीत उर्फ पिंकी शर्मा कौर आणि परशुराम धर्मा धिंगाडा या चार जणांना ताब्यात घेतले.
डहाणू, तलासरी या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन मिशनरी नागरिकांकडून गोरगरीब जनतेची दिशा भूल करून व त्यांना विविध प्रकारच्या आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार सुरू आहे. यावर प्रशासनाने तात्काळ आळा घालावा. – प्रवीण व्यास राष्ट्रीय हिंदू सेवा संघ, प्रदेश महामंत्री महाराष्ट्र