कारवाई होणार की वॉशिंग मशिनमध्ये धुणार!
मुंबई : मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने काँग्रेसचे नेते अस्लम शेख नोटीस जारी केली आहे. त्यामुळे अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पर्यावरण विभागाने मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही एक ट्वीट केले आहे. यात ते म्हणतात की, अस्लम शेख – मढ मार्वे १००० कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
असलम शेख – मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा.
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे
मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले
मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे @BJP4Maharashtra pic.twitter.com/1IaEXDWQfA
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 6, 2022
काँग्रेस नेते अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. त्यापैकी ३०० कोटींची कागदपत्र आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. यामध्ये सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केले असून खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली आहे. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती, असेही सोमय्या म्हणाले आहेत.
अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचे सांगितले जाते आहे. मँग्रोजची झाडे तोडून स्टुडिओ उभारले आहेत. याला पर्यावरण विभागाने सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणीसाठी परवानगी दिली होती. पण अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचे स्टुडिओ उभारले आहेत, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. या प्रकरणात कोस्टल झोन ऑथेरीटी यांना पत्र लिहिले आहे. यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
दरम्यान, सोमय्यांच्या आरोपानंतर अस्लम शेख यांनी अवघ्या दोन दिवसांतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अस्लम शेख यांच्यासोबतच भाजप नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते. एकाच गाडीतून हे दोघेही फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळे अस्लम शेख यांच्यावर कारवाई होणार की वॉशिंग मशिनमध्ये धुवून पवित्र करणार अशा प्रकारच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उत आला आहे.