डॉ. मिलिंद घारपुरे
आठवून बघा कधीतरी, केव्हातरी, अशीच एखादी छोटी-मोठी घटना तुमच्या-माझ्या आयुष्यात घडून गेलेली… डोळे विस्फारायला लावणारी, आश्चर्यकारकरित्या घडलेली… नसली तर श्रद्धा निर्माण करणारी… असली तर ती दृढ करणारी, थोडीफार सारखी…!
एक तरुण ऑर्थोपेडिक सर्जन, अस्थिरोग तज्ज्ञ. एका संध्याकाळी रोड अॅक्सिडेंटची केस त्याच्याकडे येते. तरुण मुलगा. मांडीच्या हाडा-मांसाचा लगदा. जीव वाचला होता. पण आता पाय वाचवायचा होता. अत्याधिक रक्तस्त्राव. वेळ हाताशी कमी. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन.
सगळी तयारी झालेली. कॉन्फिडन्स होता. पण तरीही प्रकर्षाने त्यांना स्वतःच्या सरांशी चर्चा करायची होती. चर्चेपेक्षा आधार किंवा सल्ला हवा होता म्हणूयात त्यांच्याच भाषेत. अगदी त्याच दुपारच्या फ्लाइटने सर परदेशी गेलेले. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळ शिवाय कॉन्टॅक्ट अशक्य.
…आणि चक्क त्या सरांचा फोन. मध्ये कुठल्या तरी एअरपोर्टला कनेक्टिंग फ्लाइटच ले-ओवर काही कारणाने वाढलेलं. स्वतःच्या काही वैयक्तिक कामासाठी त्या सरांनी यांना फोन केलेला. थोडेसे अविश्वसनीय.
अर्थातच दोघांची या ॲक्सिडेंटच्या केसवर अत्यंत सविस्तर चर्चा आणि मिशन कंप्लीट!!!
थोडक्यात… अडचणीच्या वेळी मदत उभी राहते. गहन प्रश्नांची उत्तरे असतात, सापडतात, मिळतात. कुठूनही… कशीही… योग्य वेळी…
…फक्त ‘विश्वास’ हवा स्वतःवर आणि ‘श्रद्धा’ हवी स्वतःच्या सद्हेतूवर…